मेडिकलची दूरवस्था नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) स्त्रीरोग व प्रसूती आणि अस्थिरोग विभागाच्या वॉर्डात खाटांच्या तुलनेत रुग्णांची संख्या नेहमीच जास्त असते. साधारण ३० टक्के रुग्ण जमिनीवर झोपून उपचार घेतात. मात्र, मेडिकल प्रशासनाने अद्यापही यावर उपाय शोधून काढला नाही, परिणामी रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.मेडिकलच्या अस्थिरोग विभागांतर्गत वॉर्ड क्र. १ व २ येतात. या दोन्ही वॉर्डात खाटांची संख्या ४०-४० आहे. परंतु दोन्ही वॉर्ड मिळून १४० वर रुग्ण उपचार घेत आहेत. तब्बल साठ रुग्ण जमिनीवर गादी टाकून उपचार घेत आहे. शनिवारी मिसेस सीएम सत्वशीला चव्हाण यांनी मेडिकलची पाहणी केली. त्यावेळी या वॉर्डातील रुग्णसंख्या पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. विभागाचे विभागप्रमुख डॉ. सजल मित्रा यांच्या कामाचे कौतुक करीत नवीन वॉर्डासाठी प्रयत्न करा, असा सल्लाही दिला. अशीच स्थिती स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वॉर्डाची आहे. येथे तर कोणी प्रसूतीच्या कळा सहन करीत तर कोणी नवजात शिशूला कवटाळून जमिनीवर उपचार घेतात. मेडिकलच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत या दोन्ही विभागात सर्वात जास्त रुग्णांची नोंद आहे. वॉर्डाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण ठेवले जातात. यात डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण पडतो, असे असतानाही यावरील उपाययोजनेकडे कुणाचेच लक्ष नाही. मिसेस सीएमचा सल्लातरी मेडिकल प्रशासन गंभीरतेने घेईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
३० टक्के रुग्ण जमिनीवर!
By admin | Published: June 16, 2014 1:17 AM