पूजा दामले/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : यंदाच्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्येही मुलींसाठी प्रत्येक महाविद्यालयात ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.२९ मे रोजी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया पुस्तिका प्रकाशित झाली आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळ सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले होते. यंदा प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच मुलींसाठी महाविद्यालयांत ३० टक्के राखीव जागा ठेवल्या आहेत, तर भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तांसाठी ५ टक्के जागा राखीव ठेवल्याचे चव्हाण यांनी सांगितले. आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत यंदा दोनऐवजी फक्त एकच शाखा विद्यार्थ्यांना निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना ३५ ते ६० महाविद्यालयांचे पर्याय निवडण्याची मुभा होती. यंदा विद्यार्थी किमान १ तर कमाल १० महाविद्यालयांचे पर्याय निवडू शकतात. मुंबई विभागात यंदा आॅनलाइन पद्धतीने १ लाख ५९ हजार जागांसाठी प्रवेश घेतला जाणार आहे. त्यामुळे ४७, ७०० जागा या मुलींसाठी उपलब्ध झाल्या आहेत.विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केंद्रमुंबईबाहेरील विद्यार्थ्यांना मुंबईत प्रवेश घ्यायचा असल्यास मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. आॅनलाइन प्रवेशाची माहिती देण्यासाठी मुंबईत अशी ३४ केंद्रे आहेत, तर अन्य विद्यार्थ्यांना शाळांमधून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी विद्यार्थी यादीत नाव आल्यास ५० रुपये भरून महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकत होते. पण दुसऱ्या यादीत वरच्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाल्यास आधीच्या महाविद्यालयातील प्रवेश रद्द करू शकत होते. आता मात्र पहिल्या क्रमांकाच्या महाविद्यालयात नाव आल्यास प्रवेश घेणे बंधनकारक आहे. तर दुसऱ्या ते दहाव्या क्रमांकाच्या महाविद्यालयात प्रवेश न घेता दुसऱ्या यादीसाठी थांबू शकतात, असे चव्हाण यांनी सांगितले. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद विभागांमध्ये आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी मुलींना ३० टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
मुलींसाठी ३० टक्के जागांचे आरक्षण
By admin | Published: May 30, 2017 4:50 AM