मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या हरियाणातील खेळाडूला तेथील राज्य सरकार बक्षीस म्हणून यावेळी देणार आहे, तीन कोटी रुपये आणि महाराष्ट्र सरकार आपल्या खेळाडूला देते दहा लाख रुपये. याचा अर्थ हरिणायातील खेळाडूला महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यापेक्षा तीसपट अधिकची रक्कम दिली जाईल.
आता महाराष्ट्रातील वैयक्तिक सुवर्णपदक विजेत्यास दीड कोटी, रौप्यपदक विजेत्यास एक कोटी, तर कांस्यपदक विजेत्यास ७५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव क्रीडा व युवक कल्याण विभागाने तयार केला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सांघिक विजेत्या खेळाडूंना ७५ लाख (सुवर्णपदक), रौप्यपदक विजेत्या संघास ५० लाख, तर कांस्यपदक विजेत्यांना २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडाविषयक सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी नामवंत उद्योग समूहांची मदत घेतली जाईल. त्या दृष्टीने आराखडाही तयार करू, असे मंत्री बनसोडे म्हणाले.
हरिणाया अन् महाराष्ट्राची तुलनापदक हरियाणा महाराष्ट्रसुवर्णपदक ३ कोटी १० लाखराैप्यपदक १.५० कोटी ७.५० लाख कांस्यपदक ७५ लाख ५ लाख
तीन टक्के निधी क्रीडासाठी राखीव ठेवा : अजित पवारजिल्हा नियोजन आराखड्यातील तीन टक्के निधी क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्यात यावा, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात आयोजित बैठकीत क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.
सुवर्णपदक विजेत्यास फक्त १० लाख रुपये देणे हा यथोचित सन्मान नाही. खेळाडूंचा उचित सन्मान होईल अशी भरघोस रक्कम बक्षीस म्हणून नक्कीच दिली जाईल.- संजय बनसोडे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री