मुंबई : कृषी प्रक्रिया उद्योगामध्ये देशात होणाऱ्या एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड फूड इंडिया परिषदेच्या माध्यमातून जगभरातील अनेक गुंतवणूकदारांनी राज्यात अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे, अशी माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.इतर राज्यांच्या तुलनेत अन्नप्रक्रिया उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी महत्वपूर्ण निर्णय घेतले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुपटीने वाढ करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून फुंडकर म्हणाले की, राज्याने अन्न प्रकिया उद्योगांसाठी विविध परदेशी कंपन्यांशी चर्चा केली. केवळ स्थानिक शेतकऱ्यांचाच शेतमाल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचे उत्पादन तयार करण्याच्या निकषावरच परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याची संधी देण्यात येईल. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळणार आहे.वर्ल्ड फूड इंडिया या जागतिक परिषदेत राज्याच्या दर्जेदार उत्पादनांचे २३ Stall उपलब्ध करून देण्यात आले होते. जागतिक पातळीवरील संशोधक व गुंतवणूकदारांनी या Stallला भेटी देऊन राज्याच्या अन्नप्रक्रियेतील प्रणालीचे कौतुक केले. अनेकांनी राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली असून राज्य शासन मोठ्या प्रमाणावर परकीय कंपन्यांना मदत करणार आहे. यातून कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास कृषिमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
देशातील एकूण अन्नप्रक्रिया उद्योगातील गुंतवणुकीपैकी ३० टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात- पांडुरंग फुंडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 7:15 PM