मुंबई : एसटी महामंडळाला सध्या अनेक आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत असतानाही एसटीच्या वाहकांकडूनच एसटीला चुना लावला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तिकिटांमध्ये वाहकांकडून अपहार करण्यात येत असून, वर्षाला ३00 कोटींचा फटका बसत असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.सुरक्षा व दक्षता विभागाने १ एप्रिल २0१४ ते ३१ मार्च २0१५ या कालावधीत वाहकांची ३ हजार ६२३ अपहाराची प्रकरणे उघडकीस आणली असून, यामध्ये सर्वाधिक प्रकरणे औरंगाबाद, पुणे आणि मुंबई प्रादेशिक विभागातील आहेत. औरंगाबादमध्ये ७२८, पुण्यात ७५३ तर मुंबईत ५९४ प्रकरणे उघडकीस आली आहेत. त्यानंतर नागपूर, नाशिक, अमरावतीचा समावेश आहे. यामुळे महामंडळाला काही लाखांचा फटकाही बसला आहे. ही प्रकरणे उघडकीस आली तरी ती फारच कमी असून, त्याहीपेक्षा अधिक प्रकरणे असल्याची दाट शक्यता वरिष्ठ अधिकारी सांगतात. परंतु कमी मनुष्यबळामुळे पाहिजे तशी कारवाई होत नाही आणि खूपच कमी प्रमाणात प्रकरणे उघडकीस येतात. एसटी महामंडळाकडून याबाबत अभ्यास करण्यात आला असून, तिकिटांचा मोठा अपहार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हा फटका बसू नये आणि अफरातफरीला आळा बसावा यासाठी एसटीकडून प्रयत्नही सुरू आहेत. तिकिटांच्या अपहार प्रकरणात योग्य ती कारवाई केली जाते. काही प्रकरणे ही न्यायालयात जातात आणि न्यायालयाच्या निर्णयानुसारही कारवाई होते. अपहार प्रकरणांना आळा बसावा यासाठी एसटी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. - संजय खंदारे, (एसटी महामंडळ-व्यवस्थापकीय संचालक)अपहार कसा होतो ?एसटीकडे तिकिटांचे पैसे जमा न करणे, पैसे कमी जमा करणे, तिकिटांचे उर्वरित पैसे न देणे, कमी अंतरावचे तिकीट पाहिजे असतानाही जादा अंतरावरचे तिकीट देऊन पैसे लाटणे अशा अनेक कारणांमुळे पैसे कमी जमा होत असल्याचे सांगितले.
वर्षभरात ३00 कोटींचा अपहार
By admin | Published: August 12, 2015 3:33 AM