- मनोज मोघे
मुंबई : कमी पर्जन्यमानामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर सरकारकडून केंद्राच्या निकषांनुसार ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला. या तालुक्यांच्या मदतीसाठी एनडीआरएफच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून ३ हजार कोटींची मदत मागितली जाणार आहे. बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत याविषयीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.तीन हजार कोटींचा प्रस्ताव तयार करताना यामध्ये कृषी, जलसंधारण, पाणीपुरवठा विभाग तसेच कर्जांचे पुनर्गठन या स्तरांवर मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
उर्वरित तालुक्यांत काय? मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून दुष्काळ ठरविण्याचे निकष बैठकीत ठरविण्यात येतील. ५०० मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याबाबत मदत व पुनर्वसन विभागाकडून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.