मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील भगवती बंदरात क्रूझ टर्मिनल उभारण्यासाठी ३०२ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंबंधीचा शासन निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. गाळ काढणे व खोदकाम करणे, धक्का तयार करणे, लाटरोधक भिंतीची उंची वाढविणे, टर्मिनल इमारत उभारणे, रस्ते, वाहनतळ व फूटपाथ उभारणे, संरक्षक भिंत उभारणे, विद्युतीकरण, सांडपाणी योजना, उद्यान, अग्निरोधक यंत्रणा उभारणे यासाठी हा निधी खर्च करण्यात येईल.
या प्रकल्पासाठी राज्य सरकार ५०, तर केंद्र सरकार ५० टक्के निधी देणार आहे. राज्य सरकार २०२४-२५ मध्ये एक कोटी, २०२५-२६ मध्ये ७० कोटी, तर २०२६-२७ मध्ये ८०.८१ कोटी असा १५१ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी देईल. केंद्र सरकारही तेवढाच वाटा उचलेल. भगवती बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे.
- रत्नागिरी रेल्वे स्थानकापासून १९ किमी अंतरावर भगवती बंदर असून जवळच विमानतळदेखील आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळे ही भगवती बंदराच्या आसपास आहेत. याशिवाय मोरा, ता. उरण येथे रो-रो जेट्टी बांधणे - ८८.७२ कोटी, खारवाडेश्री येथे जेट्टी व अन्य सुविधा निर्माण करणे-२३.६८ कोटी, कोलशेत, जि. ठाणे येथे जेट्टीचे बांधकाम करणे-३६.६६ कोटी, मीरा-भाईंदर येथे जेट्टीचे बांधकाम ३० कोटी, डोंबिवली येथे जेट्टी २४.९९ कोटी, काल्हेर येथे जेट्टी २७.७२ कोटी, गेट वे ऑफ इंडिया येथील रेडिओ क्लबजवळ जेट्टीची उभारणी व अन्य कामे २२९ कोटी, एलिफंटा येथे जेट्टीची सुधारणासाठी ८७.८४ कोटी, उत्तन येथे रो-रो जेट्टीचे बांधकाम ३०.८९ कोटी असे एकूण ५७९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.