मुंबई : राज्यासह मुंबईत उन्हाचा पारा दिवसागणिक चढतो आहे, त्यामुळे नागरिक त्रासले आहेत. परिणामी, राज्यभरातील विविध रुग्णालयांमध्ये १५ मार्च ते ५ मे या काळात ३०३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर उष्माघात नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, राज्यात सात जणांचा उष्माघाताने बळी गेला आहे. यात हिंगोलीमध्ये दोघांचा बळी गेला असून बीड, परभणी आणि धुळे येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू ओढावला आहे.उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण अकोल्यात असून त्यांची संख्या १३८ एवढी आहे. तर नागपूरमध्ये ११२ , लातूरमध्ये ४१, नाशिक आणि संभाजीनगरमध्ये प्रत्येकी सहा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या परभणी आणि जालन्यात तापमान ४२ अंशांवर पोहोचले आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.उन्हाच्या चटक्यामुळे जुलाब, उलट्या, ताप, सर्दी, खोकला, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, पोटऱ्यांत वेदना येणे अथवा रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन होणे यासारखी लक्षणे दिसतात. त्यावर राज्याच्या आरोग्य विभागाने सरकारी रुग्णालयांना उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत, असे राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश भोई यांनी सांगितले. राज्यातील सर्व सरकारी जिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करावा. त्या वॉर्डात वातानुकूलित यंत्रणा लावावी. जेणेकरून तो संपूर्ण वॉर्ड थंड राहिला पाहिजे. त्यामुळे उष्णाघाताच्या रुग्णाला त्या ठिकाणी दाखल करून त्याच्यावर उपचार करणे शक्य होईल. उष्माघाताचा रुग्ण आल्यास त्याला वातानुकूलित खोलीत ठेवावे अथवा हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे, कूलर लावावेत, अशा सूचनादेखील देण्यात आल्याचेही डॉ. भोई यांनी सांगितले.
राज्यात आढळले उष्माघाताचे ३०३ रुग्ण, सात जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 6:50 AM