सुरेश लोखंडे,
ठाणे- चिकणगुन्यावगळता जिल्ह्यात डेंग्यू , मलेरिया आणि अन्य साथीच्या आजारात ४०८ जण सापडले असून, यापैकी ३१ जणांचा या किरकोळ आजारांनी जीव घेतला आहे. यातील ११ जणांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले असून, आरोग्य यंत्रणेला उर्वरित २० जणांच्या मृत्यूचे कारण अद्याप शोधता आलेले नाही. मृत्यूची सर्वाधिक संख्या कल्याण-डोंबिवली महापालिकेसह मीरा-भार्इंदरमध्ये अधिक असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया या निश्चित तापांच्या साथीसह अन्य तापाची २५ ठिकाणी साथ उद्भवली आहे. त्यातील ३१ जणांचा मृत्यू या आठ महिन्यांत ओढावला आहे. यातील एक मृत्यू नुकताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या काचोळे तीसगाव येथील डेंग्यूच्या साथीदरम्यान झाला आहे. मात्र त्याचा मृत्यू डेग्यूनेच झाला, हे स्पष्ट व्हायचे आहे. जिल्ह्यात मलेरियाची साथ सहा ठिकाणी उद्भलेली आहे. यामध्ये ६३ जणांना या साथीची लागण झाली असता त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डेंग्यूच्या साथीच्या रूग्णांची संख्या सर्वाधिक असून, त्यात २० जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात या २४ जणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. तर नगरपालिकांमध्ये दोन मृत्यू झाले असून, ग्रामीण व आदिवासी भागात देखील चार मृत्यूची नोंद आढळून आली आहे. >आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वाधिक १३ जाणांचा मृत्यू झाला आहे. या खालोखाल मीरा-भार्इंदर महापालिकेत आठ रुग्ण दगावले आहेत. ठाण्यात दोन, भिवंडी महापालिकासह ग्रामीण भागात तीन मृत्यू झाले आहेत. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये दोन मृत्यू आहेत. शहापूर, मुरबाडच्या आदिवासी व ग्रामीण भागात सहा जणांचा मृत्यू या साथीच्या किरकोळ आजारांनी ओढावलेला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून उघड झाले आहे. या साथीच्या आजारांमध्ये झालेल्या मृत्यूची संख्या महापालिका क्षेत्रात सर्वाधिक आढळून आली आहे. यामुळे महापालिकांच्या आरोग्य यंत्रणेसह साफसपाईच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.