ठाणे : जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने लोकसहभागातून फळा आणि खडूविना सुरू केलेल्या डिजिटल स्कूल शाळेची संकल्पना ‘डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून’ राज्यभर पसरली आहे. राज्यातील ३२ हजार ३४२ शाळांचे डिजिटलायझेशन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ३०९ शाळांचा समावेश आहे.शहापूर तालुक्यातील पष्टेपाडा या शाळेतील शिक्षक संदीप गुंड यांनी लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा सुरू करून त्याद्वारे मुलांना शिक्षण देण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वी केला. त्यामुळे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यापासून ३० किलोमीटर दूर असलेल्या पष्टेपाडा या आदिवासी दुर्गम भागातील मुले टॅबद्वारे शिक्षण घेत आहेत. या उपक्र माची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये हा उपक्र म राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शिक्षण सचिव नंदकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल कार्यप्रेरणा व कार्यशाळेच्या माध्यमातून राज्यातील ३३ जिल्ह्यांत गुंड यांनी ६७ कार्यशाळांमधून तेथील शिक्षकांना डिजिटल शाळेची संकल्पना काय आहे, ती कशी राबवली जाते, त्याचे महत्त्व काय? हे पटवून दिले. तसेच त्यासाठी कसे वातावरण असावे, कोणकोणती साधने वापरावीत तसेच आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीचा प्रभावीपणे कसा वापर करता येतो, याचे मार्गदर्शन केले. तसेच अॅण्ड्रॉइड फोनच्या वापराबाबतही प्रोत्साहित केले. छोट्या गोष्टीतून आणि कमी खर्चात ही साधने उपलब्ध होतात. त्यातच, लोकसहभाग कसा उभारायचा, याचेही धडे देण्यात आले. विशेष म्हणजे या घेतलेल्या कार्यशाळेने प्रभावित होऊन अनेक शिक्षकांनी आपली शाळा कशी डिजिटल करता येईल, यासाठी प्रयत्न सुरू केल्याने राज्यातील तब्बल सहा हजार शाळांचे आजच्या घडीला डिजिटलायझेशन होऊन तेथेदेखील मुलांना शिक्षण मिळू लागले आहे. इंग्रजी शाळेकडे वळलेला विद्यार्थी आज पुन्हा मराठी शाळेकडे येत असल्याचे चित्र अनेक शाळांमध्ये दिसू लागल्याचे गुंड यांनी सांगितले.
राज्यातील ३२ हजार शाळा डिजिटल
By admin | Published: April 25, 2016 5:22 AM