प्राची सोनवणे, नवी मुंबई तृतीयपंथीय गेली ३२ वर्षे कोपरी गावातील भवानीमाता मंदिरात गणेशोत्सवाचे आयोजन करीत आहेत. तृतीयपंथीयांची वस्ती असणारे कोपरीगाव, महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे. सुमारे ३० वर्षांपूर्वी तृतीयपंथीय कोपरी गावात वास्तव्यास आले तेव्हा, स्थानिक नागरिक द्विधा मन:स्थितीत होते. समाजात नेहमीच तिरस्काराची वागणूक मिळणारे हे तृतीयपंथी गणेशोत्सवानिमित्त १० दिवस एकत्र येण्याचा प्रयत्न करतात.गावातील हे तृतीयपंथी दिवसाला जमा होणाऱ्या पैशांतून काही हिस्सा या गणेशोत्सवासाठी देत असतात. १९८२ पासून कोपरी गावातील तृतीयपंथीयांकडून नवरात्रोत्सव व गणेशोत्सव आयोजित करण्यात येतो. मुंबईत जे. टी. बी. डोंगरावरील तृतीयपंथीयांचा सार्वजनिक गणेशोत्सव वगळता मुंबईत या पंथाचा दुसरा गणपती नाही. मात्र नवी मुंबईतील कोपरी गावाच्या वेशीवर (जुन्या) गेली अंबा मातेच्या मंदिरात सार्वजनिक गणेशोत्सवाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्तिभावाने केली जात आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन होते. ३० वर्षांपूर्वी या तृतीयपंथीयाने काही हजारात येथील ग्रामस्थांकडून जागा विकत घेतली. पै-पैसा करून येथे एक अंबामातेचे मंदिर बांधले. आता त्या मंदिरात गणेशोत्सव आणि नवरात्र हे दोन मोठे धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शांती पुजारी यांनी या उपक्रमाला सुरुवात केली होती.गणेशेत्सवात नाच, गाणी, भजन हा असा गणपती जागरणाचा कार्यक्र म असतो. या जागरणासाठी गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, कल्याण, ठाणे, मुलुंड, भांडुप या मध्य रेल्वेच्या पट्ट्यातील अनेक तृतीयपंथी येथे येतात. घणसोलीतील मूर्तीकार रोहिदास पाटील यांच्या कुंचल्यातून साकार झालेली गणेश मूर्ती तृतीयपंथी घेऊन येतात. ही मूर्ती आणताना या तृतीयपंथीयांचा उत्साह काही औरच असतो. कोपरी नाक्यापासून वाजत-गाजत ही मूर्ती अंबामातेच्या मंदिरापर्यंत आणली जाते.अशीच मिरवणूक गणेश विसर्जनासाठी काढली जाते. आजूबाजूचे २०० ते ३०० तृतीयपंथीय या मिरवणुकीत सामील होतात. गणेशोत्सव काळात दहाही दिवस सायंकाळच्या आरतीनंतर संगीताच्या तालावर होणारा नृत्याचा कार्यक्र म हे गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. समाजातील दुर्लक्षीत घटकाला समाजात मानाचे स्थान मिळावे याकरिता बाप्पाकडे साकडे घालणार असल्याची माहिती महेशदिली(पिंकी) पुजारी यांनी दिली. समाजातील एकोपा टिकून राहावा अशी प्रार्थना बाप्पाकडे केली जाणार आहे. दुय्यम वागणूक मिळणा-या या समाजाला बरोबरीचे स्थान मिळावे अशीच अपेक्षा असल्याचीही प्रतिक्रीया यावेळी व्यक्त करण्यात आली.
तृतीयपंथीयांच्या गणेशोत्सवाचे ३२वे वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2016 3:20 AM