ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १ - सध्या राज्यभरातील २४ टक्के वीज ग्राहकांकडे सुमारे ३ हजार २०० कोटींची थकबाकी असून, यामुळे या सर्व ग्राहकांकडील वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आला आहे. अशा या सर्व ग्राहकांसाठी महावितरणतर्फे येत्या १ नोव्हेंबरपासून ‘अभय योजना’ सुरू करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केली.
विशेष म्हणजे, या सर्व ग्राहकांकडील वीज पुरवठा कायमचा खंडीत करण्यात आला आहे. मात्र तरी ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने वीज घेत आहे. यामुळे महावितरणला फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय या सर्व ग्राहकांकडे ३ हजार २०० कोटींची थकबाकी अडून पडली आहे. या योजनेच्या माध्यमातून ती थकबाकी वसूल करून, या सर्व वीज ग्राहकांकडील पुन्हा वीज पुरवठा सुरू करण्यासाठी ही योजना असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
या योजनेत थकबाकीदारांकडील ७५ ते १०० टक्के व्याजाची रक्कम आणि १०० टक्के विलंब आकार माफ होणार आहे. तसेच एक महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास त्यातील ५ टक्के रक्कम ही परत दिली जाणार आहे. एकूण ३ हजार २०० कोटींच्या थकबाकीमध्ये २ हजार ६४९ कोटी रूपयांची मूळ थकबाकी असून, त्यात ५४६ कोटी रूपयांच्या व्याजाचा समावेश आहे.
शिवाय यामध्ये घरगुती ग्राहकांकडे १ हजार ८६७ कोटी, लघुदाब वाणिज्यिक ग्राहकांकडे ४३६ कोटी, लघुदाब औद्योगिक ग्राहकांकडे २१० कोटी, पथदिवा योजनांकडे ६ कोटी, शितगृह ग्राहकांकडे ६ कोटी, तात्पुरती जोडणी घेतलेल्या ग्राहकांकडे २४ कोटी, सार्वजनिक सेवांकडे १२ कोटी, जाहिराती व होर्डिंग्जकडे २ कोटी, पावरलुम ग्राहकांकडे २४ कोटी आणि उच्चदाब ग्राहकांकडे ६०८ कोटींची थकबाकी असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.