मुंबई : मुंबईतील आॅटोरिक्षा परवान्यांच्या यशस्वी अर्जदारांची मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा आरटीओकडून घेण्यात येणार आहे. मुंबई वडाळा आरटीओकडून शनिवारी २७ फेब्रुवारीपासून या चाचणीला सुरुवात झाल्यानंतर दोन दिवसांत ३३४ उमेदवार मराठी चाचणीत नापास झाले आहेत. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र व पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद महापलिका क्षेत्रात १२ जानेवारी रोजी ४२ हजार ७९८ आॅटोरिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर शासनाने घालून दिलेल्या अटीप्रमाणे यशस्वी अर्जदारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याची माहीती दिली होती. परिवहन विभागाकडून त्यानुसार २९ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंतमराठी भाषेच्या ज्ञानाची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. चाचणीसाठी उमेदवाराला मराठी पाठ्यपुस्तकातील परिच्छेदाचे वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. या चाचणीत यशस्वी झाल्यावर त्यांना तात्काळ इरादापत्राचेही वाटप करण्याचा निर्णय घेतला. मात्र कमी मनुष्यबळामुळे होणारा कामाचा ताण पाहता वडाळा आरटीओने या चाचणीला २७ फेब्रुवारीपासूनच सुरुवात केली. या आरटीओकडून पाच हजारपेक्षा जास्त यशस्वी उमेदवारांची मराठीची चाचणी घेण्यात येणार आहे. २७ आणि २८ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी १,२00 उमेदवारांची चाचणी घेण्यात आली. या दिवशी एकूण १ हजार ३२७ उमेदवारांनी चाचणी दिली आणि ३३४ उमेदवार नापास झाल्याची माहीती आरटीओकडून देण्यात आली. जवळपास ९७१ उमेदवारांनी शुल्क भरल्याचे सांगण्यात आले.
मराठी चाचणीत तब्बल ३३४ उमेदवार नापास
By admin | Published: February 29, 2016 3:27 AM