मुंबई : कॉपोर्रेट क्षेत्राच्या सहभागातून विविध सामाजिक क्षेत्रात अमुलाग्र बदल घडविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज विविध कॉपोर्रेट कंपन्यांबरोबर ३४ सामंजस्य करार करण्यात आले.या एकत्रित सहभागातून राज्याच्या विकास प्रक्रियेत तसेच लोकांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.नागपूर येथे रिजनल मेंटल हॉस्पिटलचा विकास आणि मॉडेल मेंटल हेल्थ कार्यक्रमाची अंमलबजावणी, चंद्रपूर जिल्ह्यात एल्डरली केअर कार्यक्रम, नागपूर महापालिका क्षेत्रात आरोग्यविषयक कार्यक्रम, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमधील माजी मालगुजारी तलावांचे पुनुरुज्जीवन, अकोला, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान, नाशिक जिल्ह्यातील धरणे आणि तलावांतील गाळ काढणे, सोलापूर जिल्ह्यातील कासळगंगा नदीचे पुनरुज्जीवन, गडचिरोली, नाशिक, नंदूरबार आणि पालघर जिल्ह्यातील ३० आदिवासी आश्रमशाळांचा विकास, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात कर्करोग केअर सिस्टीम सुरु करणे, गोरेगाव आणि परेल येथे पशुवैद्यकीय केंद्र सुरु करणे आदींबाबत टाटा ट्रस्टबरोबर करार करण्यात आले.अमरावती जिल्ह्यात पोषण कार्यक्रम राबविण्याबाबत टाटा केमिकल बरोबर सामंजस्य करार करण्यात आला.गडचिरोली जिल्ह्यातील गावांचा विकासमागासवर्गीय आणि आदिवासी युवकांना कौशल्य विकास प्रशिक्षण, जव्हार, जि. पालघर येथील आयटीआयमधील तांत्रिक प्रशिक्षणात सुधारणा, साकूर, ता. जव्हार येथील आदिवासी मुलींच्या निवासी शाळेचा विकास आदीबाबत टाटा पॉवरशी करार करण्यात आले.गाळमुक्त धरण, शिवार अभियानाबाबत टाटा सेंटर आॅफ डेव्हलपमेंट शिकागो विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार झाला. शासनाच्या व्हिलेज सोशन ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशनशी आदित्य बिर्ला फाउंडेशनने केलेल्या करारानुसार गडचिरोली जिल्ह्यातील गावांचा विकास होणार आहे.मान्यवरांची हजेरी : आदित्य बिर्ला सेंटर फॉर कम्युनिटी इनिशिएटिव्हच्या अध्यक्षा राजश्री बिर्ला, टाटा ट्रस्टचे विश्वस्त अमित चंद्रा, टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सरडाणा, झुनझुनवाला फाउंडेशनचे राकेश झुनझुनवाला, डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी, वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्टचे अध्यक्ष हेमेंद्र कोठारी, इनाम होल्डींगचे अध्यक्ष वल्लभ भन्साळी, डॉ. आनंद बंग आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक विकासासाठी ३४ करार, मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 4:38 AM