मुंबई : गोरेगावमधील हिरेप्रदर्शन स्टॉलमधून ३४ लाखांचा हिरा चोरण्यात आला होता. या प्रकरणी वनराई पोलिसांनी काही तासांत दोन चिनी चोरांना मंगळवारी अटक केली.चियांग चांग क्विंग आणि डेंग झियाबो अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. २७ ते ३१ जुलैदरम्यान गोरेगावमध्ये एक आंतरराष्ट्रीय हिरे प्रदर्शन भरले होते. ज्यात देश-विदेशातील मौल्यवान दागिने ठेवण्यात आले होते. या प्रदर्शनातील एका स्टॉलवरून ५.४३ कॅरेटचा एक हिरा लंपास करण्यात आला.ही बाब स्टॉलमालकाला समजताच त्यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड तसेच वनराई पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जोत्स्ना रासम यांनी पोलीस निरीक्षक महादेव निंबाळकर, भरत घोणे आणि पथकाच्या मदतीने चौकशी सुरू केली.या पथकाने स्टॉल परिसर तसेच त्या ठिकाणी असलेल्या कामगारांची चौकशी केली.तसेच सीसीटीव्ही फूटेज पाहिले. तेव्हा त्यात दोन चिनी व्यक्ती त्यांना संशयास्पद वाटले. त्यांनी त्या दोघांची माहिती काढली, ज्यात ते दोघे चीनला जाण्यासाठी निघाले असून, आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांनी इमिग्रेशन औपचारिकता पूर्ण केल्याचे पोलिसांना समजले. याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (सीआयएसएफ) देत पोलिसांनी त्यांना अडविण्यास सांगितले. सीआयएसएफ जवानांनी लगेचच त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर निंबाळकर यांचे पथक विमानतळावर पोहोचले आणि दोन्ही चिनी चोरांना त्यांनी अटक केली.शॅम्पूच्या बाटलीत लपविला हिरा!-चौकशीत भाषेचा अडसर येत होता. अखेर एका दुभाषीच्या मदतीने निंबाळकर यांनी त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या शॅम्पूच्या बाटलीत त्यांनी तो हिरा लपवल्याचे निष्पन्न झाले. हा हिरादेखील पोलिसांनी हस्तगत केला आहे.
गोरेगावातून ३४ लाखांचा हिरा चोरीला, चीनी चोराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 4:41 AM