लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : अकरावीच्या पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या ४८ हजार ३१५ विद्यार्थ्यांपैकी बुधवार अखेरपर्यंत केवळ १४ हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला आहे. उद्या (गुरुवारी) सायंकाळी ५ पर्यंतच प्रवेशाची मुदत शिल्लक असताना ३३ हजार ८७२ विद्यार्थ्यांनी अद्यापही प्रवेश घेतलेला नाही. पहिल्या पंसतीक्रमाचे महाविद्याय मिळालेल्या विद्यार्थ्यांना उद्या प्रवेश घ्यावाच लागेल; अन्यथा ते प्रक्रियेतून बाहेर पडतील. उर्वरित विद्यार्थ्यांना मात्र पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल.केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवडमधील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारी सायंकाळी ५ पर्यंत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या दिवशीही सर्वच महाविद्यालयांमध्ये मोठी गर्दी झालेली होती. बहुतांश महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशासाठी विशेष व्यवस्था केलेली होती. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी प्रवेशाला वेग आल्याचे चित्र महाविद्यालयांमध्ये दिसून आले. बुधवारी सायंकाळपर्यंत प्रवेश मिळालेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी केवळ १४ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. त्यामध्ये कला शाखेच्या १,४३३, वाणिज्य शाखेच्या ५ हजार ७५१, एमसीव्हीसीच्या २९८, तर विज्ञान शाखेच्या ६,८२० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. एकूण ३२ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले, तर १०९ जणांना कागदपत्रांतील त्रुटीमुळे प्रवेश नाकारण्यात आला आहे. यंदा अकरावी प्रवेशासाठी ७८ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीकडे अर्ज केले होते. >महाविद्यालयांच्या प्रवेशाचा कटआॅफ वाढूही शकेलअकरावीच्या गुणवत्ता यादीनुसार अनेक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. मात्र, आपल्याला हवे असलेलेच महाविद्यालय मिळावे, यासाठी मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश न घेता थांबण्याचा विचार ते करीत आहेत. पुढच्या फेरीत कटआॅफ आणखी कमी होण्याची अपेक्षा ते करीत आहेत. मात्र, यंदा अकरावीच्या प्रवेशाची प्रत्येक फेरी स्वतंत्रपणे राबविली जात आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या रिक्त जागा व विद्यार्थ्यांची मागणी, यानुसार महाविद्यालयांचे कटआॅफ पुढच्या फेरीत वाढू शकण्याचीही शक्यता आहे, याचाही विचार विद्यार्थ्यांनी करणे आवश्यक आहे.>प्रवेशाची प्रवर्गानुसार यादी लावावीअकरावी प्रवेशाची महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता यादी लावताना सर्वसाधारण प्रवर्ग, एसी, एसटी, ओबीसी यांची एकत्रित यादी लावण्यात आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत आहे. ती यादी सर्वसाधारण, एसी, एसटी, ओबीसी अशी स्वतंत्रपणे लावण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली आहे.>आज ११ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावाच लागेलअकरावीसाठी पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले असल्यास तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे, अन्यथा ते प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे. पहिल्या फेरीत पहिल्या १९ हजार ९९१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. त्यापैकी ९ हजार २४३ विद्यार्थींनी आतापर्यंत प्रवेश घेतलेले आहेत. उर्वरित १० हजार ७४८ विद्यार्थ्यांना आज (गुरूवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश घ्यावाच लागेल, अन्यथा त्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागणार आहे.>गुणांत बदल करून मिळेलकलागुणांचे वाढीव गुण निकालानंतर मिळाल्यामुळे गुणांत बदल झाला असल्यास त्याबाबतचे राज्य मंडळाचे पत्र घेऊन आल्यास शिक्षण उपसंचालक कार्यालयात अकरावीच्या अर्जातील गुणांत बदल करून दिला जात आहे. त्याचबरोबर, इतर बोर्डाच्या ग्रेडचे मार्कात रूपांतरही या कार्यालयातून केले जात आहे.
प्रवेशासाठी ३४ हजार विद्यार्थ्यांना आज अखेरची संधी
By admin | Published: July 13, 2017 12:56 AM