सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्लेची नगरपालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीसाठी २७ नोव्हेंबरला निवडणूक होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारच्या शेवटच्या दिवशी एकूण ३४0 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये २७ इच्छुकांनी नगरध्यक्षपदासाठी अर्ज भरले आहेत. उमेदवारी अर्जांवर बुधवार, २ नोव्हेंंबर रोजी छाननी होणार असून, ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निवडणुकीचे ११ नोव्हेंबरनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.नव्याने दाखल झालेल्या देवगड नगरपंचायतीसाठी ७६ अर्ज दाखल झाले आहेत. सावंतवाडी नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी ७, तर सर्वाधिक नगरसेवकासाठी १00 असे एकूण १0७, मालवणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ९ आणि नगरसेवकपदासाठी ६२ असे एकूण ७१, तर वेंगुर्लेमध्ये नगराध्यक्षपदासाठी ११ आणि नगरसेवकपदासाठी ७५ अशा मिळून एकूण ८६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे तीन पालिका आणि एक नगरपंचायतमध्ये ६८ जागांसाठी एकूण ३४0 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)>मालवणमध्ये काँग्रेसकडून आचरेकरांना डच्चूमालवणचे माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांना काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळालेली नाही. काँग्रेसने दीपक पाटकर यांना उमेदवारी दिली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर समर्थक राजा गावकर यांना शिवसेनेतून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी शनिवारी काँग्रेसमधून नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला आहे. मालवणमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदासाठी १४, राष्ट्रवादीचे ३, शिवसेनेचा नगराध्यक्षपदासाठी १ आणि नगरसेवकपदासाठी ९, भाजपने ८ आणि मनसेने १ असे अर्ज दाखल केले आहेत.जिल्ह्यातील वेंगुर्ले व सावंतवाडी नगरपालिकेची मुदत १८ डिसेंबर रोजी संपत आहे, तर मालवण नगरपालिकेची मुदत २४ डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे या तिन्ही नगरपालिका आणि नव्याने निर्माण झालेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. वेंगुर्ले आणि सावंतवाडी या नगरपालिकेमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप हे चारही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात आहेत. मालवणमध्ये शिवसेना-भाजप युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यामध्ये थेट लढत होत आहे, तर देवगड-जामसंडे नगरपंचायतीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप युती अशी तिहेरी लढत आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शनिवारच्या शेवटच्या दिवशी देवगड-जामसंडे नगरपंचायतीसाठी एकूण ७६ जणांनी अर्ज दाखल केले. यात केवळ काँग्रेसनेच १७ पैकी १७ जागांवर स्वतंत्र उमेदवारी अर्ज भरले आहेत. शनिवारी शेवटच्या दिवशी तब्बल ४९ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. सावंतवाडी पालिकेत एकूण १0७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे प्रमुख चारही पक्ष स्वतंत्ररीत्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. वेंगुर्लेतही एकूण ८६ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या ठिकाणी सर्व पक्ष वेगवेगळे लढत आहेत.राजन पोकळे यांचा अपक्ष अर्ज सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक असणारे राजन पोकळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात हलचल माजली आहे. पोकळे यांची नाराजी शिवसेनेला भोवणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष खुर्चीवरून सावंतवाडीचा एकत्र कारभार हाकणारे बबन साळगावकर आणि राजन पोकळे आता नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आमने-सामने होणार आहेत.
सिंधुदुर्गात ६८ जागांसाठी ३४0 अर्ज
By admin | Published: October 31, 2016 5:28 AM