लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जिल्ह्यातील ३४८ अंगणवाड्यांना स्वत:च्या हक्काची इमारत मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने अंगणवाडीची इमारत बांधण्यासाठी १५ कोटी १२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे जागेअभावी समाजमंदिर आणि इतरत्र भरत आहेत. राज्य शासनाकडून एक अंगणवाडी बांधण्यासाठी जवळपास सहा लाख रुपये निधी दिला जातो. मात्र, जागेअभावी अंगणवाडी बांधता येत नाही. इमारत नसल्यामुळे अंगणवाडीत जाणाऱ्या मुलांना आज समाजमंदिर तर उद्या खासगी खोलीत बसावे लागते. काही गावांमध्ये अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरतात. काही अंगणवाड्या झाडाखाली किंवा मिळेल त्या ठिकाणी उघड्यावर भरविल्या जात आहेत. अंगणवाड्यांमध्ये जाणाऱ्या बालकांना झाडाखाली किंवा ओट्यावर बसून शिक्षण व पोषण आहार घ्यावा लागत आहे.पूर्वी नागरिक अंगणवाड्यासाठी जागा देत होते. मात्र, सद्यस्थितीला जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे ग्रामस्थ अंगणवाड्यासाठी जागा देत नाही. ग्रामपंचायतीच्या जागा गावाच्या बाहेर आहेत. अशा ठिकाणी अंगणवाडीची इमारत बांधता येणार नाही. गावाच्या लगतच्या जमिनीवर अतिक्रमण झालेले आहेत. यामुळे अंगणवाड्यांसाठी जागा मिळणे हा प्रश्न कठीण झाला आहे. महिला व बाल कल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अंगणवाड्यांसाठी बांधण्यासाठी ४५० गावांमध्ये जागा उपलब्ध असल्याचे समोर आले होते. सन २०१६-१७ साली जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून १२२ अंगणवाड्यांच्या इमारत बांधण्यासाठी मंजुर केल्या होत्या. तसेच या वर्षी सन २०१७-१८ मध्ये २१३ अंगणवाड्याची इमारत बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे. आदिवासी भागामध्ये १३ अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. असे जवळपास ३४८ अंगणवाड्याच्या इमारतीची कामे या वर्षी होणार आहे. जागेअभावी १ हजार ७०३ अंगणवाड्यांना इमारत नाहीनुकतेच जिल्ह्यामध्ये सध्या खासगी जागेत ४७९, मंदिरात ९१, समाजमंदिरात १६४, प्राथमिक शाळेतील वर्गामध्ये ६८७, इतर ठिकाणी १३४, आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या जागेत १६१ अंगणवाड्या भरत आहे. जिल्ह्यात ४ हजार ६०३ अंगणवाड्या आहेत. यापैकी २ हजार ९०० अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत आहे. मात्र, अद्याप जागेअभावी १ हजार ७०३ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत बांधता येत नाही. या वर्षी जवळपास ३४८ अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत होणार आहे. यामुळे अंगणवाडीतील चिमुकल्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होऊन शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे. यावर्षी सन २०१७-१८ साली खेड ४७, बारामती ३७, हवेली २५, आंबेगाव २३, इंदापूर २२, शिरूर २०, दौंड १२, भोर ६, मावळ ५, पुरंदर ५ अशी तालुकानिहाय मंजुर अंगणवाड्यांची संख्या आहे. - राणी शेळके, सभापती, महिला व बालकल्याण समिती
३४८ अंगणवाड्यांना मिळणार हक्काची इमारत
By admin | Published: June 09, 2017 12:57 AM