कोपरगाव (अहमदनगर) : शिवसेनेत मला प्रमोशन व्हायला ३० वर्षे लागले. पाचव्यांदा आमदार झाल्यानंतर मंत्री झालो. निष्ठेचे फळ मिळाले. ३५-४० केसेस झाल्याने मी मंत्री झालो, असे विधान करत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे खळबळ उडविली.मंत्री होण्याच्या एक दिवस आधी मी जेलमध्ये होतो. ‘बॅचलर आॅफ जेल’ म्हणजे शिवसैनिक. हीच आपली पदवी आहे, असेही ते म्हणाले. संत जनार्दन स्वामी भक्तनिवासात आयोजित सोहळ््यात महंत रामगिरी महाराज यांना पाटील यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी ‘धर्मरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव घोलप होते.पाटील म्हणाले, शिवसेनेत किती आले, किती गेले. मात्र सच्चा शिवसैनिक अजून त्याच बुरूजावर आहे. कारण, शिवसेना हा केवळ पक्ष व संघटना नसून तो एक विचार आहे आणि विचार हा कधीच संपत नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम शिवसेना करते. रस्त्यावर भाजीपाला विकणारे घोलप, पानटपरी चालवणारा पाटील पक्षामुळे मंत्री झाला. टोपली विणणाऱ्याला खासदार तर सायकलवाल्या नारायण राणेंना मुख्यमंत्री केले. शिवसेना ही शिस्तबध्द, वचनबध्द, सेवाभावी संघटना आहे. येथे निष्ठेला अधिक महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. जीवनात सत्कार्य केल्यास सत्कार होतो, असे रामगिरी महाराज म्हणाले. कर्तव्याचे पालन व धर्माचे रक्षण करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले़ (प्रतिनिधी)
३५-४० केसेसमुळेच मी मंत्री झालो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2016 4:38 AM