ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 8 - देवळाली कॅम्प परिसरात उपस्थित राहून लष्करात भरती करून देण्याच्या नावाखाली मुंबईतील एका युवकासह इतर सहा जणांची ३५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या युवकाचे वडील यशवंत मारोती पाटील (५४, रा़ ८/१, नसरूद्दीन चाळ, गावदेवी रोड, कांदीवली (पूर्व, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात संशयित प्रकाश विक्रम चव्हाण (रा़ लखमापूर, ता़ सटाणा, जि़ नाशिक) विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित प्रकाश चव्हाण हा देवळाली कॅम्पच्या परिसरात उपस्थित राहून सैन्यात भरतीसाठी आलेल्या युवकांना हेरून भरतीचे आश्वासन देत असे़ २३ नोव्हेंबर २०१३ ते २७ जानेवारी २०१५ या कालावधीत कांदीवली येथून भरतीसाठी आलेल्या पाटीलसह अन्य सहा युवकांना भरतीचे आश्वासन देऊन प्रत्येकी सहा ते साडेसहा लाख रुपयांची मागणी केली़ या युवकांनी चव्हाणच्या स्टेट बँक आॅफ इंडियाचे खात्यावर (३१७९४४१७३४९) ३४ लाख ५ हजार रुपये जमा केले़ तर यशवंत पाटील यांनी मुलाच्या नोकरीसाठी चव्हाणची भेट घेऊन ८० हजार रुपये रोख दिले होते.
संशयित चव्हाणच्या खात्यात पैसे जमा करून दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी सैन्यात भरती केले नाही़ त्यामुळे यशवंत पाटील यांनी पाठपुरावा केला असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे गाठून संशयित चव्हाणविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली़.