आकोली (जि.वर्धा) : स्वत:ला कंपनीचा एजंट भासवून दुप्पट भावात जमीन विकून देतो, असे सांगून सावध येथील मंगेश रामकृष्ण साठे याने दयालनगर वर्धा येथील राजकुमार कन्हैयालाल कलवानी यांना ३५ लाखांनी गंडविले. या प्रकरणी कलवानी यांच्या तक्रारीवरुन खरांगणा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास फसवणुकीची अनेक प्रकरणे पुढे येण्याची शक्यता पोलीस सूत्राने वर्तविली आहे.पोलीस सूत्रानुसार, मंगेश साठे याने आपण मुंबई येथील एका कंपनीचा एजंट आहे. सदर कंपनीकरिता शेती खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, असे पटवून दिले. त्याने कथित एजंट सुरेंद्र भारती याच्या माध्यमातून कलवानी यांची भेट घेतली. कलवानी यांना तुम्ही शेती खरेदीच्या व्यवहारात रकमेची गुंतवणूक करा. ती तुम्हाला दुप्पट करून देतो, असे आमिष दिले. कलवानी यांचा विश्वास संपादन करण्याकरिता मंगेशने मौजा सावध येथील शेत सर्व्हेे नं. ९० मधील काही शेती कंपनीला विकल्याचे बनावट कागदपत्र दाखविले. यात पोलशेट्टीवार नामक इसमाला ५१ लाख ५० हजार रुपयांचा फायदा करून दिल्याचे सांगितले. यावरुन त्याने कलवाणी यांना विश्वासात घेतले. अशातच मदना येथील बाबा गोसावी व अशोक गोसावी यांनी त्यांची शेती विक्रीकरिता काढली होती. ही शेती विकत घेण्याचा सल्ला साठे याने कलवानी यांना दिला. दुप्पट रक्कम मिळवून देण्याचे सांगून मदना येथील शेत सर्व्हे नं. १६७ ची विकत घेण्यासाठी कलवानीकडून साठे याने ४२ लाख रुपये घेतले. यापैकी केवळ सात लाख रुपये साठे याने सदर शेतीची किंमत म्हणून गोसावी यांना दिले. या व्यवहाराला दोन महिन्यांचा कालावधी झाल्याने कलवानी यांनी साठे याची भेट घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्यांनी साठेसोबत भ्रमणध्वनीवर चर्चा केली. यावेळी पुन्हा त्याने रक्कम दुप्पट करून देणार असल्याचे सांगितले. यानंतर ४ जून २०१४ रोजी कलवानी यांनी मंगेशला भ्रमध्वनीवर संपर्क साधला असता तो उत्तर देत नव्हता. शिवाय भेटण्याचेही टाळू लागला. यावरून आपली फसगत झाल्याचे कलवानी यांच्या लक्षात आले. या व्यवहारात एकूण त्यांनी ३५ लाख रुपयांनी गंडा बसला. यावरून त्यांनी सदर प्रकरणाची तक्रार खरांगणा पोलिसात केली. पोलिसांनी तपासाअंती राजकुमार कलवानी यांच्या तक्रारीवरुन कलम ४२०, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. यातील आरोपी मंगेश रामकृष्ण साठे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद तिजारे, प्रमोद खिराळे तपास करीत आहे.(वार्ताहर)
शेतीच्या व्यवहारात ३५ लाखांची फसवणूक
By admin | Published: August 10, 2014 1:24 AM