मुंबई : मुंबईत मेट्रोचे ११८ किमी मार्गाचे जाळे उभारण्यासाठी राज्य शासनातर्फे ३५ हजार ४00 कोटी रुपये बुधवारी मंजूर करण्यात आले. मुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमएमआरडीएची बैठक पार पडली. त्यात या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये मेट्रो-२ मधील दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्दच्या ४0 किमीसाठी १२ हजार कोटी, मेट्रो-४ मधील वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासार वडावलीमार्गे वडाळा मुख्य टपाल कार्यालय आणि आर. ए. किडवाई मार्गाच्या ४0 किमीसाठी १२ हजार कोटी, मेट्रो मार्ग-५ मधील २७ किमीच्या दहिसर पूर्व-अंधेरी पूर्व-वांद्रे पूर्वसाठी ८ हजार १00 कोटी रुपये आणि मेट्रो मार्ग-६ मधील ११ किमीच्या जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यासाठी ३ हजार ३00 कोटी रुपये मंजूर केले. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने तयार केलेले अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व आणि दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो मार्गाचे अहवाल राज्य शासनाने मान्य करावेत, अशी शिफारस एमएमआरडीएकडून करण्यात आली होती. या दोन मेट्रो मार्गांचे विस्तृत प्रकल्प अहवाल मान्य करण्यात आले आहेत. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व प्रकल्पाची ४ हजार ७३७ कोटी आणि दहिसर ते डी. एन. नगर मेट्रोची ४ हजार ९९४ कोटी रुपये एवढी किंमत आहे. या प्रकल्पांसाठी अर्थ साहाय्य उभारण्यास जागतिक बँक, जपान आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था आणि इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था यांच्यामार्फत कर्ज साहाय्य घेण्याच्या प्रस्तावासही प्राधिकरणाने मान्यता दिली आणि राज्य शासनाकडे तशी शिफारसही केली. दरम्यान, वांद्रे-कुर्ला संकुलास स्मार्ट दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ९५ कोटी ५७ लाख इतक्या खर्चासही मंजुरी देण्यात आली. पालघर, कल्याणमधील रस्त्यांसाठीही निधीपालघर, कल्याण,अंबरनाथ, कर्जत आणि कुळगाव-बदलापूर परिसरातील रस्ते विकासाच्या कामांसाठी ६0 कोटी ६१ लाख रुपये खर्चाला मंजुरी या बैठकीत देण्यात आली. तीन उन्नत मार्गासाठी ७४३ कोटी वान्द्रे-कुर्ला संकुल आणि सांताक्रुझ-चेंबूर जक्शनवरील वाहतुककोंडी सोडवण्यासाठी तीन उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहेत. महानगर टेलिफोन निगम जक्शन ते लाल बहादूर शास्त्री उड्डाणपुलापर्यंत, कुर्लापासून (कपाडीया नगर) पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ वाकोलापर्यंत आणि भारत डायमंड बोर्सपासून पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळील वाकोलापर्यंतचा उन्नत मार्ग वाहतुक कोंडी सोडवण्यासाठी मदत करतील. त्याच्या ७४३ कोटी ७३ लाख रुपये खर्चासही मंजुरी देण्यात आली.
मेट्रोसाठी ३५ हजार ४०० कोटी
By admin | Published: August 27, 2015 5:08 AM