मुंबई : एसटी महामंडळाने सुरू केलेल्या चालक व वाहक पदाच्या भरतीमधील ८ हजार ०२२ जागांसाठी तब्बल ३५ हजार ६१७ अर्ज दाखल झाले आहेत. अनुसूचित जमातीच्या अर्जांत यंदा वाढ झाल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. मात्र, महिला उमेदवारांकडून भरतीकडे पाठ फिरविल्याने संबंधित जागा समांतर आरक्षणामुळे पुरुष अर्जदारांच्या वाट्याला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इच्छुकांना १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील.भरती प्रक्रियेत ८ हजार ०२२ जागांपैकी महिलांसाठी ३० टक्के आरक्षण देत, एसटीने तब्बल २ हजार ४०६ जागा उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, चालक व वाहक पदाच्या सरासरी पाच जागांसाठी एका महिलेने अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. या जागांसाठी सुमारे ४२० महिलांनीच अर्ज केल्याची माहिती आहे. शेवटच्या दोन दिवसांत त्यात कितपत वाढ होईल, याबाबत महामंडळाकडूनही साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे समांतर आरक्षणाच्या माध्यमातून अर्जदार महिलांच्या भरतीनंतर उरलेल्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबविल्यास, त्या-त्या संवर्गातील पुुरुषांच्या वाट्याला या जागा जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आदिवासी बहुल विभागातील एसटी स्थानकांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करत, मोठ्या प्रमाणात महामंडळाने अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्याचा चांगला परिणाम अर्जांच्या स्वरूपात दिसत असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले.शासनाच्या इतर विभागांत अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त राहत असताना, एसटीतील ६८५ पदांसाठी तब्बल १ हजार ७७२ अर्ज आल्याची माहिती महामंडळाने दिली आहे. हा प्रतिसाद पाहून आदिवासी विभागाने महामंडळाच्या प्रयत्नाचे कौतुक केले असून, इतर शासकीय विभागांनी महामंडळाचे अनुकरण करण्याचा उपरोधक सल्लाही दिला आहे.
एसटी भरतीमधील ८ हजार जागांसाठी ३५ हजार अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 2:56 AM