कोल्हापूर : मुख्याध्यापक पदोन्नती प्रस्तावास जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यासाठी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ सहायकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर (वय ४५, रा. संभाजीनगर, मूळ गाव शिवाजी रोड, मुरगूड, ता. कागल) असे त्याचे नाव असून त्याला गजाआड करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दसरा चौकातील एका हॉटेलच्या बाहेर ही कारवाई करण्यात आली. दोन हजार रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटा व्यवहारात येवून दोनच दिवस झाले. तोपर्यंत सावर्डेकर हे त्याच १७ नोटा घेताना जाळ््यात अडकले. त्यामुळे नवा चलनानंतरची ही राज्यातील पहिली घटना आहे.याबाबतची माहिती अशी, मनोहर वसंतराव जाधव हे शिवस्मारक शिक्षण मंडळाच्या महाराणा प्रताप हायस्कूल, दुधाळी येथे लिपिक असून, ते जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे शहर सचिव आहेत. हायस्कूलच्या पूर्वीच्या महिला मुख्याध्यापिका सय्यद या सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी पदोन्नतीने नाथाजी राजमाने यांची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाची मान्यता घेण्यासाठी दि. २ नोव्हेंबरला संस्थेतर्फे प्रस्ताव पाठविला होता. त्याची चौकशी करण्यासाठी सोमवारी (दि. ७) लिपिक जाधव सावर्डेकरना भेटले असता त्यांनी ४० हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर जाधव यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. (प्रतिनिधी)ज्योत्स्ना शिंदेंची होणार चौकशी- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडून मंजुरी घेण्यासाठी वरिष्ठ सहायक सावर्डेकर यांने लिपिक जाधव यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. त्यामुळे शिंदे यांचीही याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक उदय आफळे यांनी सांगितले.कोठडीची हवा सावर्डेकर राहत असलेल्या संभाजीनगर, मुरगूड येथील घरावर पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रे व मालमत्तेची माहिती घेतली. त्यानंतर रात्री उशिरा त्याची करवीर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी केली. याठिकाणी त्याच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती.नव्या नोटांची मागणीसावर्डेकर यांने जाधव यांच्याकडे आपल्याला दोन हजारांच्या नव्या नोटाच द्याव्यात, अशी मागणी केली होती. ५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यामागे भ्रष्टाचार रोखणे हा एक महत्वाचा हेतू असल्याचे सांगण्यात येत होते. परंतू हा हेतू अवघ्या तिसऱ्या दिवशीच फोल ठरला.
नव्या नोटांनीच घेतली ३५ हजारांची लाच
By admin | Published: November 13, 2016 2:46 AM