पुणे : राज्यात लागू केलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील ३० टक्के प्लास्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. राज्यात दररोज १ कोटी दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांचा कचरा तयार होतो. ग्राहकांकडून धुतलेल्या दूध पिशव्या परत घेऊन पुनर्निर्मिती साखळीत जमा केल्यास आपण दररोज ३५ टन प्लास्टिक पिशव्यांचा कचरा कमी करु शकतो, असे राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शनिवारी येथे सांगितले.अमनोरा पार्क टाऊन मधील साडेपाच हजार कुटुंबांकडून कोणत्याही प्रकारचे वापरलेले प्लॅस्टिक परत घेण्याच्या उपक्रमास कदम यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन, अमनोरा पार्कटाऊन व सिटी कॉपोर्रेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, रीसायकल संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, रीसायकलचे चेतन बारेगर या वेळी उपस्थित होते.अमनोरामधील कुटुंबांकडून धुतलेल्या दूध पिशव्या, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थांच्या रॅपरच्या स्वरूपात येणारे प्लॅस्टिक असे कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक ‘रीलूप’ या अॅपच्या मदतीने गोळा केले जाणार आहे. यात गोळा केलेल्या प्लॅस्टिकच्या बदल्यात नागरिकांना प्रतिकिलो २० गुण म्हणजेच २० रुपये अॅपच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हे गुण नागरिक वेगवेगळ्या २०० ब्रँड्सच्या खरेदीसाठी वापरु शकतील, असे कदम यांनी सांगितले.श्रीवास्तव म्हणाले, प्लास्टिक कचºयात गेल्यास त्यातील पुर्ननिर्मितीची संधी वाया जाते. तसेच कचºयातील प्लास्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे प्लास्टिक संचय व पुर्ननिर्मिती गरजेची आहे.अमनोरामध्ये २०१० पासूनच प्लॅस्टिक गोळा करून पुर्ननिर्मितीस देण्यास सुरूवात केली असून, अमनोराला राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त टाऊनशिप करण्यासाठी प्रयत्न करु,असे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.अभय देशपांडे म्हणाले, अधिकाधिक नागरिकांना प्लॅस्टिक जमा करून ते पुर्ननिर्मिती साखळीत देण्यासाठी प्रवृत्त करता येईल. हडपसरमध्ये ३०० ठिकाणी चितळे दूध ग्राहकांकडील धुतलेल्या दूध पिशव्या गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. ---------------------दूध पिशवीमागे मिळणार पैसे‘दूध ग्राहकांना धुतलेली दूध पिशवी परत करताना अर्ध्या लिटरच्या पिशवीमागे २५ पैसे व १ लिटरच्या पिशवीमागे ५० पैसे परत दिले जाणार असल्याचे, श्रीपाद चितळे यांनी सांगितले. ------------------