लोकमत न्यूज नेटवर्क महाड : रायगड किल्ल्यावर २ आणि ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. तब्बल १ हजार ६०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले जाणार आहेत. शिवप्रेमींची कोणतीही गैरसोय होऊ नये याकरिता पोलिसांकडून शिवप्रेमींसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
रायगड किल्ल्यावर यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. गडावर २ जूनला तिथीनुसार, तर ६ जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. साडेतीनशेवे वर्ष असल्याने या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने ठोस नियोजन केले असून, २६ समित्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पोलिसांनी १ हजार ६०० पोलिस रायगड व परिसरात तैनात करण्याचे नियोजन केले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड या ठिकाणी आणि रायगडावर दोन पोलिस मदत केंद्र असणार आहेत.
गर्दी टाळण्यासाठीचित्तदरवाजा व नाणे दरवाजा मार्ग रायगड चढण्याची सुविधा आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन शिवप्रेमींनी सकाळी गढ चढावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हे दोन्ही मार्ग महादरवाजा येथे एकत्र येतात. तेथून रायगडावर जाताना महादरवाजा हा एकमेव दरवाजा असल्याने त्या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
पार्किंगची व्यवस्थामुंबई-गोवा महामार्गावरुन महाडकडून रायगडकडे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कोंझरझ या गावी दोन वाहनतळे, तर वाळसुरे या ठिकाणी एक वाहनतळ उभारण्यात आले आहे. पुणे तसेच अन्य मागणी माणगाव निजामपूर मार्गे रायगडकडे येणाऱ्या शिवप्रेमींसाठी कवळीचा माळ व पाचाड बौद्धवाडी येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.