- विलास गावंडे यवतमाळ : कोरोना निर्बंध शिथिल झाले असले तरी एसटीला अद्यापही अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत. बसफेऱ्या कमी होत आहेत आणि काही गाड्या ऐनवेळी रद्दही होत आहेत. याचा फटका रोजंदारी कर्मचाऱ्यांना बसत आहे. काही कर्मचाऱ्यांची हजेरी भरणे थांबविण्यात आले आहे. ‘काम नाही, तर दाम नाही’ हे एसटीचे धोरण आहे. यामुळे राज्यातील ३५०० रोजंदारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे.
कोरोनाच्या आधी एसटीचे दररोजचे उत्पन्न २२ कोटी रुपये इतके होते. आज आठ ते दहा कोटींच्या घरातच आहे. शाळा, महाविद्यालये बंद आहेत. शहरातील प्रतिष्ठाने लवकर बंद होतात. त्यामुळे नागरिक प्रवास करणे टाळतात. यामुळे बसफेऱ्या कमी झाल्या आहेत. सुरू फेऱ्यांवर प्रथम एसटीच्या कायम कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. यानंतर रोजंदार गट क्र. २ आणि नंतर रोजंदार गट क्र. १च्या चालक-वाहकांना पाठविले जाते.
आता काही ठिकाणी रोजंदार गट क्र. १च्या अर्थात महामंडळात नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कामगिरी देणे थांबविले आहे. पुढील काही दिवसात ही गती वाढण्याचे संकेत आहेत. राज्यात ३५०० रोजंदार गट क्र. १ कामगार आहेत. ते २०१८-१९ च्या भरती प्रक्रियेत महामंडळाच्या सेवेत दाखल झाले आहेत. सुरुवातीपासूनच त्यांना कामगिरी मिळण्यात अडथळे येत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच त्यांना कामगिरीसाठी भांडावे लागत आहे. आता पुन्हा त्यांच्यावर संकट आले आहे.
प्रवासी संख्या कमी असल्याने बसफेऱ्यांवर परिणाम झाला आहे. गरजेनुसार कर्मचाऱ्यांना संधी दिली जात आहे. पुढील काळात तसेच शाळा सुरू झाल्यानंतर फेऱ्या वाढतील. त्यावेळी पुन्हा कामाची संधी मिळेल.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक, यवतमाळ
लॉकडाऊनमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना ऑनड्यूटी समजून वेतन देण्यात येईल, असे शासनाचे परिपत्रक आहे. कामगिरी मिळो किंवा न मिळो सर्वांना वेतन मिळाले पाहिजे.श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
...तर आर्थिक गणित कोलमडणारnकोरोनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. त्यामुळे एसटीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारास विलंब होण्याची शक्यता आहे. जर पगारास विलंब झाला, तर कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित कोसळण्याची शक्यता आहे.