मुंबई- २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच मराठी भाषा गौरव दिन ! याही वर्षी मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. उद्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे सायंकाळी ६.०० वाजता साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला सांगीतिक कार्यक्रमही सादर करण्यात येणार आहे. तसेच विविध साहित्य प्रकारांचे ३५ राज्य वाङ्मय पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना, पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार पुणे येथील वरदा प्रकाशनाला, डॉ. अशोक केळकर भाषाअभ्यासक पुरस्कार अविनाश बिनीवाले यांना आणि कविवर्य मंगेश पाडगावकर भाषासंवर्धक पुरस्कार मराठी विज्ञान परिषद या संस्थेला पुरस्कार वितरित केले जाणार आहेत.
पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुप्रसिद्ध कलाकार रवींद्र साठे, उत्तरा केळकर यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकारांनी ‘मराठीच्या पोतडीतून’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या 15 दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्येही ‘अमृताचिये मराठी’ या कार्यक्रमाद्वारे मराठी भाषा दिन साजरा केला जाणार आहे. यात पुरुषोत्तम बेर्डे यांच्यासह अनेक प्रथितयश कलाकार सहभागी होतील. महाराष्ट्रातील अकरा (११) विद्यापीठांच्या माध्यमातून राज्यातील विविध शहरांत मराठी भाषेची स्थित्यंतरे दर्शविणारे दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम मराठी रसिकांसाठी सादर करतील. ह्या विविध कार्यक्रमांत सुमारे ५०० प्रथितयश कलाकारांचे हजारो रसिक श्रोत्यांच्या उपस्थितीत सादरीकरण होणार आहे.