लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका परदेशी तरुणाकडून तब्बल सहा किलो कोकेन रविवारी जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या कोकेनची किंमत सुमारे ३६ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. फ्रेडी अॅन्ड्रेस असे तस्करी करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो कोलंबियन रहिवासी आहे. लॅपटॉप व बॅगेत लपवून कोकेनची तस्करी करण्याचा प्रयत्न त्याने केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई विमानतळावर एक कोलंबियन नागरिक मोठ्या प्रमाणात कोकेन घेऊन येणार आहे, अशी माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी विमानतळ परिसरात पाळत ठेवली होती. फे्रडी अॅन्ड्रेस याच्या संशयास्पद हालचालीवरून पथकाने त्याला ताब्यात घेतले. ‘स्कॅनिंगद्वारे झडतीमध्ये त्याच्या लॅपटॉपमध्ये काही पाकीट असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याची सविस्तर झडती घेतली असता लॅपटॉप व त्याच्या बॅगेतून कोकेनची १२ पाकिटे मिळाली.फ्रेडी हा टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. उच्चभू्र वर्गातील मंडळी व महाविद्यालयीन तरुणांना पार्टीमध्ये पुरविण्यासाठी त्याने कोकेनची तस्करी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तो नेमका कोणाकडे त्याची ‘डिलीव्हरी’ करणार होता, याबाबत माहिती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
विमानतळावर ३६ कोटींचे कोकेन जप्त
By admin | Published: June 12, 2017 2:37 AM