ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - जरीपटक्यातील मौजा नारा परिसरातील नऊ एकर जमीन गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या पथकाने शुक्रवारी जप्त केली. या जमिनीची किंमत बाजारभावाप्रमाणे किमान ३६ कोटी रुपये आहे. तूर्त जमिनीच्या मालकी हक्काचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर संबंधितांना त्या जमिनीचा कायदेशीर ताबा दिला जाणार आहे. जरीपटक्यातील कुंगू कॉलनीतील रहिवासी रोशन मनिहलदास जोधानी (वय ४१) आणि त्यांचे भागीदार टिकमदास मोटवानी, प्रकाश आसुदानी, ओमप्रकाश गोकुलदास बजाज तसेच सुखदेव प्रेमचंद भागनानी यांनी एकत्र येऊन झुलेलाल डेव्हलपर्स नामक फर्म बनविली होती. या सर्वांनी ५ एप्रिल १९९९ ला मौजा नारा येथील खसरा क्रमांक २००/३, २००/४ आणि २०४ /३ मधील जमिन कमलेश जयस्वाल आणि अन्य चार जणांकडून नऊ एकर जमीन खरेदी केली होती. कोतवालीतील द्वितीय निबंधक कार्यालयात त्याचे विक्रीपत्र झाले होते. त्या आधारे १४ फेब्रुवारी २००० मध्ये भूमी अभिलेख कार्यालयात सर्व भागीदारांची नावे सात-बारावर नोंदविण्यात आली होती. दरम्यान, एप्रिल २००० मध्ये संबंधित जमीनमालकांची नातेवाईक उषाताई लाला जयस्वाल यांनी जमिनी खरेदी करणाऱ्या सर्व भागीदारांविरोधात न्यायालयात केस दाखल केली होती. न्यायालयाने २६ जून २००६ ला निकाल देताना ह्यजैसे थेह्य स्थितीचा आदेश दिला होता. ते पाहून झुलेलाल डेव्हलपर्सचे भागीदार ओमप्रकाश बजाज यांनी त्यांचे दुसरे भागीदार सुखदेव भागनानीसोबत संगनमत करून ओमप्रकाश यांचे बंधू जयप्रकाश गोकुलादास बजाज यांना संबंधित जमिनीची पॉवर आॅफ अटर्नी करून दिली. त्यानंतर ओमप्रकाश बजाज यांचे बंधू जयप्रकाश तसेच सुरेश बजाज यांची नावे ७/१२ वर नोंदली गेली. डिसेंबर २०१६ मध्ये रोशन जोधानी जमिनीचा ७/१२ घेण्यासाठी गेले तेव्हा भूमी अभिलेख कार्यालयात त्यांना जमिनीच्या ७/१२ वर त्यांच्या भागीदारांच्या नावाऐवजी जयप्रकाश बजाज आणि सुरेश बजाजची नावे दिसली. ही बनवाबनवी पाहून जोधानी यांनी जरीपटका ठाण्यात धाव घेतली. मात्र, तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न देता कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. प्रॉपर्टी सेलकडून न्याय भूमिकाउपराजधानीतील कोट्यवधींच्या भूखंडांशी संबंधित बनवाबनवीच्या प्रकरणाचा तपास लावण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी एसआयटी आणि तत्पूर्वी प्रॉपर्टी सेलची निर्मिती केली. जोधानी यांनी पोलीस आयुक्तांकडे आपल्या प्रकरणाची तक्रार केली. आयुक्त तसेच सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे आणि उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर्टी सेलचे पोलीस निरीक्षक वजिर शेख यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यात जोधानी यांचा त्यांच्या भागीदारांनी विश्वासघात केल्याचे उघड झाले. त्यामुळे प्रॉपर्टी सेलतर्फे कोतवाली ठाण्यात झुलेलाल डेव्हलपर्सचे भागीदार ओमप्रकाश बजाज, सुखदेव भागचंदानी, जयप्रकाश बजाज, सुरेश बजाज आणि दुय्यम निबंधक (नागपूर क्रमांक -३ ), नारा येथील पटवारी तसेच सीताबर्डीच्या मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ओमप्रकाश बजाज, सुखदेव भागचंदानी या दोघांना अटक करण्यात आली तर अन्य आरोपींची चौकशी केली जात आहे. विशेष म्हणजे, ८ जुलैला या प्रकरणाचा कोर्टातून निकाल येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वीच आरोपींनी ही जमीन विकू नये म्हणून जप्तीची कारवाई करण्यात आली.
३६ कोटींची जमीन जप्त, गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलची कारवाई
By admin | Published: June 30, 2017 10:24 PM