अमरावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के म्हणजेच १६ गुण मिळविणे आवश्यक राहणार आहे़ आता बोर्ड परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला ३६ गुण मिळवावे लागणार आहेत़ याची अंमलबजावणी मार्च २०१६ पासून करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत इयत्ता दहावीसाठी २० गुणांची तोंडी तर ८० गुणांची लेखी, तर बारावीसाठी ३० गुणांची तोंडी वा प्रात्यक्षिक आणि ७० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. परंतु नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. यापूर्वी दहावीच्या तोंडी परीक्षेत २० पैकी २० व लेखी परीक्षेत १५ गुण मिळाले तरी उत्तीर्ण होण्याची शाश्वती राहात असे. मात्र नवीन नियमानुसार उत्तीर्ण होण्यासाठी ३६ गुण मिळवावे लागणार आहेत़ परीक्षा पद्धतीतील बदलाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हा निर्णय मार्च २०१६ च्या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (प्रतिनिधी)माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अद्याप लेखी आदेश मिळाले नसले तरी निर्णयाची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक सत्र मार्च २०१६ पासून होईल. - संजय गणोरकर,विभागीय अध्यक्ष, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, अमरावती
उत्तीर्ण होण्यासाठी हवे ३६ गुण!
By admin | Published: April 26, 2015 2:01 AM