ठाणे : दोन दिवसांपासून कल्याण रेतीबंदर परिसरातील अवैध रेतीउत्खनन करणाऱ्यांवर महसूल खात्याने केडीएमसीसह पोलीस यंत्रणेच्या साहाय्याने अचानक ठिकठिकाणी धाड टाकून रेतीमाफियांना सळो की पळो केले आहे. या कारवाईत सुमारे ३७५ सक्शन पंप व जेट्टीसह अन्यही वाहने असा ७२ कोटींचा ऐवज जप्त केला आहे. यापैकी सक्शन पंप ताब्यात घेऊन गुरुवारी त्यांचे गॅसकटरच्या साहाय्याने तुकडेतुकडे केल्याचा दावा ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केला आहे. कल्याणसारख्या अतिसंवेदनशील परिसरातील अवैध रेतीवरील ही कारवाई राज्यातील सर्वात मोठी असल्याचे सांगितले जात आहे. ट्रक, टेम्पो, जेट्टी, सक्शन पंप, जीप, क्रेन्स, ड्रेझर इत्यादी सुमारे ७२ कोटींची यंत्रसामग्री या कारवाईत जप्त केली. या मोहिमेवर स्वत: जिल्हाधिकारी पहाटेपर्यंत थांबून संपूर्ण मोहिमेवर लक्ष ठेवून होते. केडीएमसी आयुक्त ई. रवींद्रन व पोलीस उपायुक्त संजय शिंदे आदी वरिष्ठ अधिकारीदेखील त्यांच्यासमवेत होते.या धाडीमुळे अवैधरीत्या साठवलेला ५७६० ब्रास रेतीसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत सुमारे ७६ लाख आहे. रेती साठवण्यासाठी असलेले १३२ हौद व जेट्टी, सक्शन पंपांचे तुकडे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या समक्ष केले आहेत. (प्रतिनिधी)>संबंधितांवर एमपीडीएअंतर्गत गुन्हे१६ ट्रक्स, आठ छोटे टेम्पो, ३४ क्रेन्स, २९ बॉर्ज, बोटी १३, सक्शन पंप ९६ आदींसह बकेट, जाळी, जनरेटर, ड्रेझर, सिलिंडर इत्यादी ७२ कोटींची सामग्री जप्त करण्यात आली. सर्व संबंधितांवर एमपीडीएअंतर्गत गुन्हे दाखल केले असून बाजारपेठ कल्याण येथे पोलीस पंचनामे आणि गुन्हे नोंदण्याचे काम सुरू आहे. या वेळी काही छोटे कारखाने आणि अवैध तबेलेदेखील आढळले.
३७५ सक्शन पंपांचे तुकडे
By admin | Published: April 07, 2017 3:24 AM