मनोहर कुंभेजकर,
मुंबई- महापालिकेसह म्हाडाने केलेल्या दुर्लक्षपणामुळे गोरेगाव पश्चिमेकडील सिद्धार्थनगरमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील तब्बल ३७६ कुटुंबे जीव मुठीत धरून वास्तव्य करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हे संक्रमण शिबिर असूनही म्हाडाने याकडे दुर्लक्ष केले असून, धोकादायक इमारतींच्या यादीत त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.सिद्धार्थनगरमधील म्हाडाच्या संक्रमण शिबिरासंदर्भात म्हाडा प्रशासनासोबत यापूर्वी बैठका झाल्या होत्या, असे प्रभाग क्रमांक ५१ च्या नगरसेविका प्रमिला शिंदे यांनी सांगितले. मात्र, कार्यवाही काहीच झालेली नाही. येथील नागरिकांकडे पुरावे असून, त्यांचे स्थलांतरण गोराई आणि मागाठाणे येथे करण्यात येईल, असेही म्हाडाने सांगितले होते. मात्र, या संदर्भातही काहीच कार्यवाही झालेली नाही. शिवाय त्यांचे स्थलांतरण गोरेगावातच करण्यात यावे, अशी मागणीही प्रमिला शिंदे यांनी केली आहे, तर येथे दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? असा सवाल माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी केला आहे.संक्रमण शिबिरात ३७६ कुटुंबे राहात असून, इमारतीमधील अनेक सदनिका तोडण्यात आल्या आहेत, तर काहींना तडे गेले आहेत. १ ते २४ क्रमांकाच्या इमारतीत अनेक कुटुंबे जीव धोक्यात घालून राहात आहेत. दरम्यान, १९९० साली लालबाग, परळ येथून आम्ही या ठिकाणी आलो. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही येथे राहत आहोत. येथील सदनिका रिकाम्या करण्यासाठी दबाब आणला जात असून, या प्रकरणी आम्हाला न्याय देण्यात यावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.