मुंबई: जगभरात शेकडो लोकांच्या मूत्यूला कारणीभूत ठरलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशातही वाढताना दिसतेय. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आलीय. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलंय. याच पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी राज्यातल्या सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात सध्या कोरोनाचे ३८ रुग्ण असल्याचं राजेश टोपेंनी सांगितलं. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे भागात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून पुण्यातल्या ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. राजधानी मुंबईत ६, तर उपराजधानी नागपुरात ४ रुग्ण आढळून आलेत. याशिवाय यवतमाळ, कल्याणमध्ये कोरोनाचे प्रत्येकी ३, नवी मुंबईत २, तर रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रत्येकी १ रुग्ण सापडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेशकोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. परिस्थिती आटोक्यात असली तरी गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजाअर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथीचे रोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष, संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, अशा सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Coronavirus: महाराष्ट्रात कुठल्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण?... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 4:31 PM
राज्यात कोरोनाचे ३८ रुग्ण सापडले असून सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड, पुण्यात
ठळक मुद्देपिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्णपिंपरी चिंचवड, पुण्यात कोरोनाचे १६ रुग्ण कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री