- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हाँगकाँगमध्ये अडकलेले इंडियन मेडिकल असोसिएशनचे ३९ डॉक्टर आठवड्याभरानंतर शनिवारी सुखरूप भारतात परतले. एका परिषदेसाठी हाँगकाँगमध्ये गेलेले हे पथक टूर आॅपरेटरच्या फसवणुकीमुळे तेथेच अडकून होते. हाँगकाँगला होणाऱ्या एका वैद्यकीय परिषदेसाठी गेल्या शनिवारी ३९ डॉक्टरांचे पथक तेथे पोहोचले. यांचा टूर आॅपरेटर आणि ओपेक्स ट्रॅव्हल्सचा मालक विनायक झारेकर याने त्यांच्याकडून टूरचे संपूर्ण पैसे घेतले. मात्र, परदेशात पुढील व्यवस्था करणाऱ्या हॉटेलमध्ये त्याने ते पैसे भरले नाहीत. याचा फटका डॉक्टरांना बसला. हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्यामुळे त्यांना रस्त्यांवर दिवस काढण्याची वेळ आली. पुढची टूर पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने, भारतातून इंडियन मेडिकल असोसिएशनला पैसे भरावे लागले. यात उशिरा पैसे दिल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक रकमेची भर पडली. याचा नाहक आर्थिक भुर्दंड अडकलेल्या डॉक्टरांसह त्यांच्या नातेवाईकांनाही बसला. झारेकरने मालाड मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनला ५९ लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार दहिसर पोलिसांकडे करण्यात आली आहे. त्यातील ५ लाख ६२ हजार रुपये पोलिसांनी हस्तगत केले, तर उरलेल्या पैशांची चौकशी सुरू आहे. झारेकरला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या कोठडीत २९ मेपर्यंत वाढ केली आहे. मालाड मेडिकल असोसिएशनच्या अन्य २५ डॉक्टरांचीही झारेकरने अशीच फसवणूक केली. ती टीमदेखील मकाऊमध्ये अडकली होती. त्यांना परत आणण्यासाठी नातेवाईकांनी पैसे भरले होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.