बीड : नापिकी आणि डोक्यावरचे कर्ज याला कंटाळून मंगळवारी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. चालू वर्षात आतापर्यंत १९६ शेतकऱ्यांनी जीवन संपवले आहे.शिवाजी महादेव पिंगळे (४५, रा. कासारवाडी ता. गेवराई) यांना चार एकर जमीन आहे. त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज होते. या चिंतेतूनच त्यांनी राहत्या घरी सोमवारी दुपारी गळफास घेऊन जीवन संपवले. दुसरी घटना आष्टी तालुक्यातील खलाटवाडी येथे घडली. विठ्ठल जालिंदर खलाटे (३०) यांनी मफलरने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावला. कर्जामुळेच त्यांनी आत्महत्या केली. राजेवाडी (ता. माजलगाव) येथे युनूस शब्बीर सय्यद (२८) हा शेतकरी कापूस फवारणीसाठी गेला होता. पावसाअभावी वाढ खुंटलेला कापूस व सोयाबीनमधून कर्ज फिटणार नाही या चिंतेने त्यांना ग्रासले होते. त्यांनी शेतातच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली. ईट (ता. बीड) येथे पाटीलसाहेब रंगनाथ डोईफोडे (२०) या शेतकऱ्याने नापिकी व कर्जामुळे विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.
बीडमध्ये ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: September 16, 2015 12:40 AM