औरंगाबाद : कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून मराठवाड्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. उस्मानाबाद जिल्ह्णातील वाशी येथील महादेव वसंत सांडसे (३५) यांना गोलेगाव शिवारात चार एकर शेती आहे़ महादेव सांडसे यांच्या डोक्यावर खासगी सावकाराचे कर्ज होते़ सततची नापिकी आणि खासगी सावकाराकडून पैशासाठी होणारा तगादा याला कंटाळून सांडसे यांनी रविवारी सकाळी शेतात गळफास लावून आत्महत्या केली़तुळजापूर तालुक्यातील काटी येथील बाळासाहेब एकनाथ घाणे यांना गावच्या शिवारात साडेतीन एकर जमीन आहे. खरीप हंगामात त्यांनी मूग, उडीद बियाणाची पेरणी केली होती. पावसाने दडी मारल्याने उगवलेलेपीक जागेवर करपून गेले. त्यामुळे शनिवारी रात्री बाळासाहेब घाणे हे शेतातील गोठ्यावर झोपायला गेले होते. तेथेच त्यांनी गळफास लावून घेतला.हिंगोली तालुक्यातील पांगरी (बाळसखा) येथील ३५ वर्षीय विष्णू महादजी लिंबोळे यांनी शनिवारी आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीते ‘मी जीवनाला कंटाळून आत्महत्या करीत आहे’ असा मजकूर लिहिलेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील अमृत विश्वनाथराव निर्वळ (४०) यांनी शनिवारी सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून खदानीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांना १ हेक्टर शेती आहे़ शेतीवर वडिलांनी घेतलेले कर्ज आहे़ (प्रतिनिधी)
मराठवाड्यात ४ शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Published: October 05, 2015 3:06 AM