ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मिळणारी मदत आता एक लाख रुपयांवरुन चार लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्याच्या २४ तासांमध्ये संबंधीतांपर्यंत ही मदत पोहोचवा असे आदेशही मदत पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारी यंत्रणांना दिले आहे.
परतीच्या पावसात राज्यभरात वीज पडण्याच्या घटनांनी तब्बल ४० हून अधिक जणांचा जीव घेतला. पावसाळा सुरु झाल्यापासून वीज पडून मृत्यू झालेल्यांचे प्रमाण ६९ पर्यंत पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबाना चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वीज पडून मृत्यू झालेल्या शेतक-यांच्या जनावरांसाठीही मदत दिली जाणार आहे. यात बैलांसारख्या मोठ्या जनावरांसाठी ३० हजार रुपये, गाढव, ऊंटासाठी १५ हजार आणि शेऴ्या मेंढ्यासाठी साडेतीन हजार रुपये मदत दिली जाणार आहे.