यवतमाळ/ वर्धा : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याने यवतमाळ जिल्ह्यात आणखी दोन शेतक-यांचा, तर वर्धा जिल्ह्यात एका शेतक-याचा मृत्यू झाला. धुळ्यातही एका ५८ वर्षीय शेतक-याचा फवारणीमुळे मृत्यू झाला.यवतमाळ जिल्ह्यात झरी तालुक्याच्या माथार्जुन येथे ११ आॅक्टोबर रोजी फवारणीनंतर गजानन नैताम (४८) यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्यावर यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. याच तालुक्यातील दिग्रस येथे मधुकर पोचीराम बावणे (३८) या शेतक-याला फवारणीनंतर ११ आॅक्टोबर रोजीच विषबाधा झाली. त्यालाही यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्याचाही शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.वर्धा जिल्ह्यात धाडी येथील अत्यल्प भूधारक शेतकरी हंसराज मारोतराव मनोटे (३२) याची फवारणीदरम्यान अचानक प्रकृती बिघडली. त्याला आष्टीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजता घडली.धुळे जिल्ह्यात अंजग येथे पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करीत असताना, भीमराव खंडू माळी (५८) या शेतक-याचा मृत्यू झाला. माळी हे ९ आॅक्टोबर रोजी दुपारी स्वत:च्या शेतात फवारणी करीत होते. त्याच वेळी त्यांना त्रास होऊ लागला. मुलगा दीपक याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला.बळींची संख्या २१ वर- यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून बळींची संख्या आता २१ झाली आहे. गत आॅगस्ट महिन्यांपासून जिल्ह्यात फवारणीतून विषबाधेने मृत्यूचे तांडव सुरू आहे. १९ शेतकºयांचा मृत्यू झाला होता. आता आणखी दोन शेतकºयांचा मृत्यू झाल्याने ही संख्या २१ वर जाऊन पोहोचली आहे.शेतकºयांचे इतके बळी गेल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळला भेट दिली नाही. याच्या निषेधार्थ शनिवारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बसस्थानक चौकात मुख्यमंत्र्यांच्या फलकाला डांबर फासून निषेध नोंदविला.
फवारणीचे आणखी ४ बळी; विदर्भात तिघांचा, तर धुळ्यात एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:09 AM