मुंबई - तब्बल १३ वर्षांनी विश्वकप जिंकलेली टीम इंडिया अखेर मायदेशी परतली आहे. टीममधील खेळाडूंच्या स्वागतासाठी सर्वच उत्सुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतर टीम इंडिया मुंबईत येणार आहे. मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे हे चारही खेळाडू मुंबईकर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चारही खेळाडूंचा विधिमंडळात सत्कार होणार आहे अशी माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेले आमदार हे टीम इंडियाचं प्रामुख्याने रोहित शर्मा, सूर्यकुमारचं कौतुक करायला आतुर आहे. सर्वपक्षीय आमदार अधिवेशनाला मुंबईत आहेत. त्यामुळे या खेळाडूंचा विधिमंडळाकडून सत्कार व्हावा. मुंबईकर ४ खेळाडूंचा आणि कॅप्टन रोहित शर्माचा सन्मान करावा अशी विनंती मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केल्याचंही त्यांनी सांगितले.
तसेच विधिमंडळाच्या आवारात ५ जुलैला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मासह मुंबईकर खेळाडू येणार आहेत. त्याबाबतचा अधिकृत ईमेलही त्यांच्याकडून प्राप्त झालेला आहे. उद्या या खेळाडूंचा सन्मान करावा. भविष्यात देशाचं नाव जागतिक पातळीवर नेणाऱ्या या खेळाडूंच्या सन्मानाने त्यांना आणखी ऊर्जा मिळेल. मुख्यमंत्री, मंत्री आणि सर्वपक्षीय आमदारांच्या वतीने टीम इंडियातील या खेळाडूंचा योग्य सन्मान व्हायला हवा इतर खेळाडूंनाही प्रोत्साहन मिळेल असंही आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं.
दरम्यान, विश्वकप घेऊन परतणाऱ्या लाडक्या टीम इंडियाचे क्रिकेटप्रेमींनी विमानतळ आणि हॉटेलमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी ढोल वाजवताना पाहिल्यावर ते स्वतःला रोखू शकले नाहीत. या दोघांसोबत इतर वादकही ढोलाच्या तालावर नाचताना दिसले. सूर्यकुमार यादव यांनी मनमोकळे नृत्य केले. त्यांचा डान्स पाहून सगळेच थक्क झाले. त्यानंतर रोहित शर्माने ITC मौर्या हॉटेलमध्ये केक कापून सेलिब्रेशन केले. मुंबईत आल्यानंतर टीम इंडियाची विजयी परेड एनसीपीए नरिमन पॉइंट ते मुंबईतील वानखेडे स्टेडियमपर्यंत काढण्यात येणार आहे