सोमेश्वरनगर : गेल्या दोन दिवसांपासून नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी धरणक्षेत्रात पावसाची संततधार सुरू झाल्याने पुन्हा एकदा चारही धरणे ‘ओव्हरफ्लो’ झाली आहेत. रविवारी सकाळी सहा वाजता वीर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नीरा नदीमध्ये ४ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून नीरा खोऱ्यामध्ये समाधानकारक पाऊस नव्हता. मात्र, यावर्षी पावसाने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटवली असून, बळीराजा सुखावला आहे. गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, अजून १० ते १२ दिवस हा परतीचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच वरील चारही धरणे १०० टक्के भरली होती. मात्र, अनेक भागांतून पाऊस झाला नव्हता. बारामतीचा जिरायत पट्टा पावसापासून वंचित होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून बारामतीच्या जिरायत पट्ट्यामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिरायती भागातील शेतकरी सुखावला आहे. बागायती भागात याउलट चित्र असून, बागायती भागात शेतीचे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. तरकारी पिके व उसाच्या लहान लागवडी याचे नुकसान होत आहे. काल नीरा देवघर धरणक्षेत्रात ४४ मिमी, भाटघर धरणक्षेत्रात ४१ मिमी, वीर धरणक्षेत्रात २३ मिमी तर गुंजवणी धरणक्षेत्रात ४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे नीरा देवघर धरणामधून ३५० क्युसेक्स, भाटघर धरणामधून १३०० क्युसेक्स तर गुंजवणी धरणामधून १७५० क्युसेक्सने वीर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आज सकाळी सहा वाजता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये ४ हजार ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)
४ हजार ७०० क्युसेक्सने नीरा नदीमध्ये पाणी सोडले
By admin | Published: October 03, 2016 1:53 AM