मुंबई : राज्यातील दुष्काळ निवारणासाठी राज्य शासनाने ४ हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव जागतिक बॅँकेकडे सादर केला असून हा प्रस्ताव भविष्यात संपूर्ण देशामध्ये रोल मॉडेल म्हणून स्वीकारला जाईल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.जागतिक बँकेचे कंट्री डायरेक्टर ओनो रुहल यांनी आज फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) सुधीर श्रीवास्तव आदी उपस्थित होते. दुष्काळावर मात करण्यासाठी तसेच जलयुक्त शिवार योजना, जलसंधारण, वातावरण बदल, खारपाणपट्टा, रिक्लेमेशन आदी उपाययोजनांचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भासह जळगाव, अकोला, बुलढाणा व अमरावतीतील अंदाजे ९०० गावांमध्ये खारपाणपट्टा रिक्लेमेशन करून या जमिनीची उत्पादकता वाढविण्याच उद्दिष्ट असेल. रुहल म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमची पूर्र्ण सहकार्याची भूमिका असेल. दुष्काळ निवारण्यासाठी जागतिक बँकेकडून जगभरातील उत्तम तज्ज्ञ व आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करु न दिले जाईल. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पावसाळ्यापूर्वी लगेच करावयाची कामे व पुढील ५ वर्षातील कामांबाबत जागतिक बँकेकडे सविस्तर प्रस्ताव पाठवावा, असे रुहल म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)
‘दुष्काळ निवारणासाठी हवेत ४ हजार कोटी’
By admin | Published: April 28, 2016 5:57 AM