सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेतील २४७ कोटी ७५ लाख ५४ हजार रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी २७ माजी संचालक, तीन मृत माजी संचालकांचे ११ वारसदार आणि दोन अधिकारी अशा ४० जणांवर मंगळवारी चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांनी आरोपपत्र दाखल केले. त्यात वसंतदादांचे नातू, दिवंगत माजी मंत्री तथा बँकेचे अध्यक्ष मदन पाटील यांचे वारसदार म्हणून पत्नी जयश्रीताई, कन्या सोनिया सत्यजित होळकर, मोनिका मदन पाटील यांचा समावेश आहे.संबंधितांना नोटिसा पाठविण्यात आल्या असून आरोपांवरील म्हणणे मांडण्यासाठी २५ आॅगस्ट रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. माजी संचालकांमध्ये जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्यांचा समावेश आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात एकेकाळी मोठा दबदबा असणाऱ्या या बँकेतील तत्कालिन संचालक, अधिकाऱ्यांनी नियमबाह्य व असुरक्षित कर्जवाटप मोठ्या प्रमाणावर केले. तीनशे कोटींहून अधिकच्या कर्जप्रकरणात आक्षेप नोंदविण्यात आले होते. कलम ७२ (३) प्रमाणे अंतिम झालेल्या चौकशीत १०७ खात्यांमधील २४७ कोटी ७५ लाखाच्या रकमेबाबत आता आरोप ठेवण्यात आले आहेत. ३४ माजी संचालक व ७३ कर्मचाऱ्यांची चौकशी होणार होती. मात्र चौकशीपूर्वी सहकार कायद्यातील तरतुदीनुसार पाच वर्षांपेक्षा जुन्या प्रकरणांना वगळण्यात आले. निष्कर्षांमध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, माजी संचालकांनी संस्थेच्या हितापेक्षा हितसंबंध जोपासण्यावर भर दिला. तज्ज्ञ संचालक असलेल्या चौघांनी स्वत:च्या नावे प्रतिज्ञापत्र तयार करून कर्जवाटपाच्या बैठकीस उपस्थिती दर्शविली. त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा वापर संस्थेच्या नव्हे, तर संबंधितांच्या हितासाठी केला. (प्रतिनिधी)
वसंतदादा बँकप्रकरणी ४० जणांवर आरोपपत्र
By admin | Published: August 10, 2016 4:51 AM