पेण : पेणमध्ये २००६ साली सेझ प्रकल्पासाठी शासनातर्फे भूसंपादन करण्याची रिलायन्स कंपनीला परवानगी मिळाल्यानंतर पेणच्या २४ गावांतील शेतकर्यांनी सेझ प्रकल्पाला शेतजमिनी विकून आलेल्या पैशांची गुंतवणूक जादा व्याजाच्या मोहापायी पेण अर्बनमध्ये केली. त्या शेतकर्यांच्या तब्बल ४० कोटींच्या ठेवी बँक दिवाळखोरीत गेल्याने बुडाल्याने पैसेही गेले व जमिनीही गेल्या, अशा भीषण आर्थिक संकटाचा सामना भविष्यात या शेतकर्यांना करावा लागणाार आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबाचे चरितार्थाचे साधनच गेल्याने तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी परिस्थिती या शेतकरीवर्गावर ओढवली आहे. महामुंबई एसईझेडच्या भूलभुलैयात अडकलेल्या शेतकर्यांनी जादा व्याजाच्या हव्यासापोटी आपले पैसे पेण अर्बनमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवले. एवढे पैसे घरात ठेवण्यापेक्षा बँकेत गुंतवणूक करून महिन्याकाठी या ठेवीवर येणार्या व्याजातून दरमहा कुटुंबाचा चरितार्थ चालेल, अशा वेड्या आशेपायी हा पैसा ठेवीच्या स्वरूपात गुंतवला, तर दुसरीकडे याच काळात सेझ प्रकल्प येऊन नोकरी, कामधंदा मिळेल त्यातूनही पैसे मिळतील, असे या शेतकर्यांचे नियोजन होते. पण, काळाचा महिमा, गणित वेगळेच होते़ २००८ ते २००९ या कालखंडात या ठेवी ठेवल्या़ २००९ मध्ये सेझ हद्दपार झाला तर २३ सप्टेंबर २०१० मध्ये अर्बनला टाळे लागले. जेमतेम वर्षभर या ठेवीवर व्याज घेणारे शेतकरी २३ सप्टेंबर २०१० रोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्याने हादरले़ ते आजपर्यंत सावरलेच नाहीत. बँक आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवणारा शेतकरी अखेर जमीनदोस्त झाला आणि भविष्यात वेडाही होईल, इतका मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. सेझ प्रकल्पातील दादर-रावे, कळवे, जोहे, सोखार, उर्णोली या गावांतील शेतकर्यांच्या २२ कोटींच्या ठेवी तर वाशी खारेपाटातील मोठे भाल, विठ्ठलवाडी कणे, बोर्जे, वाशी, ओढांगी, वढाव, मोठेवढाव, काळेश्री, नाखेल, बेणवले, बहिराम कोटक, दिव, कान्होबा, जनवली, लाखोले, मळेघरवाडी, मंत्रीवाडी, पैरणकरवाडी या गावांतील शेतकर्यांच्या १८ कोटींच्या ठेवी अशा ४० कोटींच्या ठेवी संकटाच्या बँक घोटाळ्यातील दिवाळखोरीत बुडाल्या आहेत. कामधंद्यासाठी शेती हे एकमेव साधन असलेल्या या शेतकर्यांचा सातबारा सेझ प्रकल्पाच्या नावावर झाल्याने प्रकल्पही गेला आणि पैसेही गेले़ आज पैसे गेले, उद्या जमिनीचा ताबा जाणाऱ खायचे काय, या घोर आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. (वार्ताहर)
शेतकर्यांच्या ४० कोटींच्या ठेवी बुडाल्या
By admin | Published: May 12, 2014 3:35 AM