अंजर अथणीकर सांगली : लोकांच्या हृदयाला भिडणारी शब्दफेक... आवाजातील भारदस्तपणा... शब्दांना एखाद्या नदीप्रमाणे खळखळत प्रवाहीत करण्याचे कौशल्य... अशा अनेक वैशिष्ट्यांनी सजलेल्या सांगलीतील एका सुंदर आवाजाने एक, दोन नव्हे, तर तब्बल ४0 प्रजासत्ताक दिनांच्या सोहळ्यांना सजविले आहे. सूत्रसंचालनाची चाळिशी पूर्ण करणाºया श्रीमंत आवाजाचा अत्यंत साधा माणूस म्हणजे विजयदादा कडणे.राष्टÑीय भावनेने इतकी वर्षे अखंडित सेवा देणारे ते एकमेव निवेदक ठरले आहेत. या सोहळ्याची वेळ त्यांनी कधीही चुकवलेली नाही. प्रजासत्ताक दिनावेळी ते ना कधी आजारी पडले, ना कधी त्यांचा आवाज बसला, हे विशेष!‘सांगलीचा आवाज’ म्हणून ते पंचक्रोशीत प्रसिध्द आहेत. ‘दादा’ म्हणून ते ओळखले जातात. आज सत्तरीत पोहोचलेले कडणे गेली ४५ वर्षे सूत्रसंचालकाचे काम करत आहेत. दैवज्ञ समाजाचे काम करीत असताना त्यांचा खणखणीत आवाज राजकीय नेत्यांच्या लक्षात आला. त्यानंतर ते सूत्रसंचालन करू लागले. यासाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही किंवा आवाजासाठी कधी पथ्यपाणी पाळले नाही. निमंत्रणाच्या ठिकाणी सायकलवरून ते वेळेआधीच तासभर पोहोचतात.प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्टÑदिन हे तीन सोहळे ते अगदी राष्टÑप्रेरणेने करतात. यासाठी कधीही मानधनाची अपेक्षा ठेवत नाहीत. ही सेवा देणे म्हणजे राष्टÑीय कर्तव्य समजतात. ४० वर्षापूर्वी ते एका कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना तत्कालीन जिल्हाधिकाºयांनी त्यांना ऐकले. त्यानंतर गेली ४० वर्षे त्यांना प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी निमंत्रण मिळत आहे.राष्टÑपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रम...विजयदादांनी तत्कालीन राष्टÑपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, व्ही. पी. सिंग ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या सभांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईक यांच्यापासून सर्वच मुख्यमंत्र्यांच्या सभांसाठीचेही सूत्रसंचालन केले आहे. दिवसामध्ये सहा, सहा कार्यक्रम पार पाडण्याची कसरत त्यांनी केली आहे.विजयदादा गेली ४० वर्षे प्रजासत्ताक दिनाचे सूत्रसंचालन करीत असताना, कार्यक्रमात कधीही अनियमितता झालेली नाही. संबंधित मंत्री, अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींकडून एक मिनिटही ध्वजारोहणास विलंब झालेला नाही. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिनाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे कार्यक्रमही त्यांनी पार पाडले आहेत. कार्यक्रम तीन-तीन तास लांबले आहेत. मात्र सुरुवात वेळेत झाली आहे. राष्टÑशिष्टाचाराचा भंग कधीही झालेला नाही. मात्र शासकीय सोहळे पार पाडताना दादा थोडेसे तणावात असतात.
‘त्या’ आवाजाने सजविले ४0 प्रजासत्ताकदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 4:18 AM