पुणे: राज्यातील ४० लाख ३७ हजार हेक्टरला वादळी पावसाचा फटका बसला आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून राज्याचा एकत्रित अहवाल मदत व पुनर्वसन विभागाने मंत्री मंडळासमोर ठेवला असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या निकषांनुसार नुकसान भरपाई द्यायची तर या बाधित क्षेत्रासाठी ३ हजार कोटी रूपये लागणार आहेत. केंद्र सरकारने ही मदत त्वरीत पाठवावी, अशी राज्य सरकारची अपेक्षा आहे. केंद्राच्या निकषापेक्षा जास्त भरपाई द्यायची असेल तर नियमाप्रमाणे त्याची जबाबदारी राज्याला स्विकारावी लागणार आहे. कोणत्याही पिकाचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले असेल तर ते भरपाईस पात्र समजले जाते. कितीही मोठ्या क्षेत्राचे नूकसान झाले असले तरी भरपाई फक्त २ हेक्टरसाठीच दिली जाते.
सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचे झाले आहे. त्या खालोखाल कापूस व नंतर खरीपातील मूग वगैरे पिके नुकसानीत गेली आहेत.मराठवाड्यातील सोयाबीनचे नूकसान सर्वाधिक असून त्यानंतर कोकणात भातपीक व पश्चिम महाराष्ट्रात अन्य पिके वादळी पावसाने नूकसानीत गेली आहेत. केंद्र सरकारच्या वतीने बागायती साठी १३ हजार ५०० जिरायतीसाठी ६ हजार रूपये व फळपिकासाठी १८ हजार रूपये प्रती हेक्टरी दिले जातात.
मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी केलेल्या पाहणी दौऱ्यात बागायती, कोरडवाहूसाठी हेक्टरी १५ हजार व फळपिकासाठी २५ हजार रूपये देऊ असे सांगितले. मात्र अद्याप त्याचा अध्यादेश निघालेला नाही, अशी माहिती कृषी विभागातून मिळाली. तोपर्यंत केंद्राच्या निकषानुसार तरी भरपाई मिळावी अशी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. पावसाने नुकसान केलेच आहे, दिवाळीपूर्वी मदत मिळाली तर दिवाळी तरी गोड जाईल अशी शेतकऱ्यांची भावना आहे.