जळगाव - राज्यातील सत्तानाट्यात प्रामुख्याने गुवाहाटीचा उल्लेख घेतला होता. कारण विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंसह तत्कालीन सरकारमधील ५० आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर या राजकीय घडामोडीत गुवाहाटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं. त्यात मुंबईला येताना शिंदेंसह सगळे आमदार गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता. आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला चालले आहेत.
या दौऱ्याबाबत बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आमच्यातील सगळेच आमदार जात आहे. पण मला जाता येणार नाही. निवडणूक असल्याने मी मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती केली आहे. ज्यादिवशी आम्ही इकडं येऊ तेव्हा २७ ची रात्र असेल. मग २८ ला आम्हाला मतदारसंघात यावं लागेल. त्यादिवशी माघारी घेण्याचा दिवस आहे. आपला एकतरी प्रतिनिधी असावा यासाठी मी विनंती केलीय. पण निश्चितपणे बाकीचे आमदार जाणार आहेत असं सांगितले. त्यावेळी आमचे ४० रेडे जातायेत. दर्शन घ्यायचं आहे असं अजब विधान त्यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, पहिलं राज्य, मराठी माणूस हे आमच्यासाठी आधी आहे. जर संजय राऊतांची ती भूमिका असेल तर आमचीही तीच भूमिका आहे. सगळ्यांची तीच भूमिका आहे. महाराष्ट्रातलं एकही गावही कर्नाटकात जाणार नाही असं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्रासाठी सर्वजण पक्ष विसरून एकत्र येतील असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.
तर शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली. मागील वेळी गेले तेव्हा तिथल्या हॉटेलचं बिल द्यायचं राहिलं. त्यामुळे त्या मालकानं आत्महत्या केल्याचं बोललं जातं. नेमकं काय झालं याबाबत माहिती नाही ही बातमी खरी आहे का माहिती नाही. पत्रकारांमध्ये चर्चा सुरू होती. आता ते दर्शनाला चाललेत असं सांगतात. काही ठिकाणी आपण बकरा कापतो, कोंबडी कापतो तसं तिथे रेडे कापतात म्हटलं जातं. रेड्याचा बळी दिला जातो मग ते कुणाचा बळी द्यायला चाललेत माहिती नाही असं सांगत अजितदादांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावर खोचक टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"