पुणे : सांगली व कोल्हापूरमधील महापुर तसेच इतर भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे विभागात एकुण ४० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १९ जण सांगली जिल्ह्यातील आहेत. ब्राम्हनाळमधील बेपत्ता सहा जणांपैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर एक व्यक्ती सुखरुप असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्राम्हनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एकुण १७ जणांचा मृत्यू झाला. शनिवारपर्यंत सहा जण बेपत्ता होते. त्यापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले आहेत. एकुण मृतांमध्ये १२ महिला व चार लहान मुलांचा समावेश आहे. आमसिध्द नरूरे हे सुखरुप असल्याचे स्थानिक भागात चौकशी केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. सांगली जिल्ह्यातील मृतांचा एकुण आकडा १९ वर पोहचला आहे. तर एक व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहे. कोल्हापुर जिल्ह्यामध्ये ६ आणि सातारा व पुणे जिल्ह्यात प्रत्येकी ७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सोलापुरमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पुणे विभागातील मृतांचा एकुण आकडा ४० वर गेला असून तीन जण बेपत्ता आहेत.
कोल्हापुर जिल्ह्यातून आतापर्यंत २ लाख ४५ हजार २२९ जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी १८८ निवारा केंद्र उभारण्यात आली आहेत. सांगलीमधील १ लाख ५८ हजार ९७० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यांच्यासाठीस ११७ ठिकाणी निवारा करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील १० हजार ४८६ तर सोलापूर जिल्ह्यातील २७ हजार जणांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. पुणे विभागातील स्थलांतरीतांची संख्या तब्बल ४ लाख ४१ हजार ८४५ एवढी आहे.
ब्रम्हनाळ दुर्घटनेतील मृतांची नावे (कंसात वय) गंगुबाई भिमा सलगर (६०), बाबूराव आण्णा पाटील (६५), वर्षा भाऊसो पाटील (४०), लक्ष्मी जयपाल वडेर (६५), कस्तुरी जयपाल वडेर (३५), राजमती जयपाल चौगुले (वय ६२), कल्पना रविंद्र कारंडे (३५), सुवर्णा उर्फ नंदा तानाजी गडदे (वय ३५), राजवीर आप्पासो घटनटटी (४ महिने), सोनाली आप्पासो घटनटटी (४), सुरेखा मधुकर नरूटे (४५), रेखा शंकर वावरे (४०), सौरव तानाजी गडदे (८), सुनिता संजय रोगे, कोमल मधुकर नरूटे (२१), मनिषा दिपक पाटील (३१), क्षिती दिपक पाटील (४).