वसंत भोसलेकोल्हापूर : देशातील सर्वार्थांनी आघाडीचे राज्य असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाचे कामकाज मुंबई कुलाबा विधानसभा मतदारसंघात असलेल्या विधानभवनातून होते. बारा कोटी महाराष्ट्रीय लोकांच्या भवितव्याचे विचारमंथन त्याच सभागृहात होते. अशी पार्श्वभूमी लाभलेल्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात सर्वांत कमी मतदान झाल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाने यापेक्षा ४० टक्के अधिक मतदानाची नोंद करून आघाडी घेतली आहे.
विशेष बाब, म्हणजे कुलाबा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विद्यमान विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळणारे भाजपचे आमदार राहुल नार्वेकर करतात. मुंबई विद्यापीठ, लोकल रेल्वेचे सर्वाधिक ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, फॅशन स्ट्रीट, अनेक कंपन्यांचे आश्रयस्थान असणारा फोर्ट परिसर, भारतीय शेअर बाजार जेथून चालतो ती दिमाखदार इमारत, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय, मुंबईतील नौदलाचा केंद्रबिंदू नेव्हीनगर आणि महाराष्ट्र सरकारचा दररोजचा राज्य कारभार जेथून चालतो ते मंत्रालय या मतदारसंघात आहे.
कुलाबा येथे ४०.४९% मतदान झाले आहे. २०१९ च्या निवडणुकीपेक्षा यात साडेचार टक्क्यांनी वाढ झाली आहे. या मतदारसंघातून असंख्य वेळा काँग्रेसचा उच्चशिक्षित उमेदवारच निवडून येत असे. सध्या तेथून व्यवसायाने वकील असलेले राहुल नार्वेकर भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत.
जवळपास झाले दुप्पट मतदान
महाराष्ट्रातील सर्वाधिक मतदानाची नोंद करणारा कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघ आहे. कोल्हापूर शहराच्या सीमेपासून पश्चिमेला गगनबावडा तालुक्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेपर्यंत करूळ घाट असा विस्तारला आहे. या मतदारसंघात एकही नगरपालिका किंवा नगर पंचायतही नाही.
परवा पार पडलेल्या निवडणुकीत करवीरमध्ये ८४.७९ टक्के मतांची नोंद झाली. महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद आहे. २०१९च्या निवडणुकीतदेखील ८४.४१ टक्के मतदान झाले होते. कुलाबापेक्षा जवळपास दुप्पट मतदान या मतदारसंघात झाले आहे.
संपूर्ण मतदारसंघ डोंगरी
करवीर मतदारसंघात अनेक नद्यांची खोरी आहेत. कुंभी, कासारी, तुळशी, धामणी या नद्यांच्या संगमाने पंचगंगेची सुरूवात या मतदारसंघातून होते. काही गावांचा अपवाद सोडला तर संपूर्ण मतदारसंघ डोंगरी आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये हा मतदारसंघ २४५ गावांमध्ये विस्तारला आहे. अनेक छोट्या-छोट्या वाड्या-वस्त्या, धनगरवाडे आहेत. दाजीपूर अभयारण्याचा काही भागही या मतदारसंघात येतो. येथे राजकीय स्पर्धा टोकाची आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील निवडून आले होते. गेल्या काही निवडणुका पाटील विरुद्ध शिवसेनेचे चंद्रदीप नरके यांच्यात झाल्या आहेत.
गेल्या जून महिन्यात पी. एन. पाटील यांचे निधन झाले. त्यांचे चिरंजीव राहुल पाटील आता शिंदेसेनेत दाखल झालेले माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याविरोधात लढत आहेत. या मतदारसंघात इतक्या ईर्षेने मतदान होते आणि राज्यात त्याचा डंका पिटतो.
मतदारांनी काय संदेश दिला?
राज्यासमोर आदर्श : करवीर (कोल्हापूर) हे ८४.७९% मतदानासह राज्यात आघाडीवर राहिले. एखादी गोष्ट ठरविली की ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत, असा कोल्हापूरकरांचा इतिहास आहे. त्यानुसार कोल्हापूरकरांनी सर्वाधिक मतदान करत राज्यासमोर आदर्श निर्माण केला आहे.
ग्रामीण मतदार जागृत : विदर्भातील चिमूर (८१.७५%) आणि ब्रह्मपुरी (८०.५४%) या मतदारसंघात ग्रामीण भागातील मतदारांनी जोरदार सहभाग दर्शवत मतदानाचा विक्रम केला. शिराळा (७८.४७%) आणि पलूस-कडेगाव (७९.०२%) येथे मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत आपला मतदानातील सातत्यपूर्ण सहभाग दर्शविला.
मराठवाड्याची संतुलित कामगिरी : छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड (८०.००%) आणि जालन्यातील भोकरदन (७७.२०%) हे मतदारांचा सक्रिय सहभाग दर्शवितात. आदिवासीबहुल नंदुरबारमधील नवापूर (७८%) हे वेगळे ठरले आहे.
पश्चिम महाराष्ट्र आघाडीवर : कोल्हापूर, सांगली आणि सातारा यांसारख्या जिल्ह्यांनी सर्वाधिक मतदानात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांची लोकशाहीप्रती असलेली बांधिलकी सिद्ध होते.
शहरी भागासाठी काय धडा? : निवडणुकीत शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागात अधिक मतदारांनी मतदान केले आहे. शहरी भागात सर्व माध्यमे असतानाही मतदार कमी प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडले. त्यामुळे शहरी भागात नावीन्यपूर्ण कार्यक्रम आखून मतदारांना मतदानाची जाणीव करून देणे गरजेचे झाले आहे.