ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - एकीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणावरून सरकारला लक्ष्य करत कर्जमाफीसाठी रान उठवलेले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ४० हजार कोटी रुपयांनी वाढ झाल्यासा दावा विधानपरिषदेत केला. तसेच समृद्धी हायवेवरून टीका करणाऱ्या विरोधकांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी "आपल्यासाठी विमान आहे. हा मार्ग लोकांसाठी आहे," असा टोलाही विरोधकांना लगावला.
आज विधानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. "पराभूत झाल्यानंतर विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलला. इव्हीएममध्ये घोटाळा झाला असे आम्हालाही वाटले होते. तुम्हालाही वाटणार, सत्य पचवायला आणि पराभव स्वीकारायला वेळ लागतो, सवय होईल." असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.
राज्याला पुनर्वसनापासून गुंतवणुकीपर्यंत नेल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या हंगामात तुरीचे उत्पादन ४.४४ लाख मेट्रीक टनांवरून २० लाख मेट्रिक टन एवढे झाले. जवळपास पाच पटीने उत्पन्न वाढले. पण सरकाने तूर खरेदी केल्याने भाव पडले नाहीत, असेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतीच्या उत्पन्नात ४० हजार कोटींनी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले.